उद्धव ठाकरेंनी 65 जागा मिळवल्या, मुंबईच्या मराठी पट्ट्यातील आपला जनाधार कायम
उद्धव ठाकरेंनी 65 जागा मिळवल्या, मुंबईच्या मराठी पट्ट्यातील आपला जनाधार कायम
मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून 71 वॉर्डमध्ये विजय मिळवला..
गेल्या 25 वर्षांपासून ठाकरेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा गड भाजप-शिंदे गटाने काबीज केला. काल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल (BMC Election Results 2026) जाहीर झाला. यामध्ये भाजप 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. तर ठाकरे गटाला 65 जागांवर समाधान मानावे लागले. हा निकाल पाहता भाजपने (BJP) मुंबईत ठाकरे गटाला चीतपट केल्याचे दिसते. मात्र, 2017च्या परिस्थितीचा विचार करता उद्धव ठाकरे यांनी काही जागा गमावल्या असल्या तरी मुंबईच्या मराठी पट्ट्यातील आपला जनाधार कायम ठेवल्याचे दिसून आले.
एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले होते. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या यशानंतर त्यांचा पक्षच बाळासाहेबांची खरी शिवसेना, असे बोलले जाऊ लागले होते. मात्र, कालच्या निकालांमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुंबईत खरी शिवसेना आमचीच, हे दाखवून दिले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर मुंबईतील शिवसेनेचे अनेक नगरसेवक त्यांच्यासोबत गेले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या मुंबईतील आजी-माजी नगरसेवकांचा आकडा 62 च्या आसपास होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी 2017 मध्ये जिंकलेल्या 84 जागा निम्म्या होतील, अशी भीती वर्तविली जात होती. मात्र, भाजपची प्रचंड ताकद आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे मराठी मतांचे विभाजन होऊनही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने 65 जागा निवडून आणल्या. यामध्ये मनसेच्या सहा जागांची भर टाकल्यास हा आकडा 71 वर जातो. त्यामुळे 2017 च्या 84 जागांच्या तुलनेत हा आकडा अगदीच कमी नाही. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपची वाढलेली प्रचंड ताकद आणि शिवसेनेत पडलेल्या मोठ्या फुटीचा विचार करता मुंबईत उद्धव ठाकरेंनी जिंकण्याइतपत जागा मिळवल्या नसल्या तरी त्यांनी 65 जागा जिंकत आपले अस्तित्व कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटाने शिवसेनेच्या अनेक बड्या नगरसेवकांना रिंगणात उतरवले होते. त्यांच्या जोडीला भाजपची कुमक असल्याने एकनाथ शिंदे यांच्या अधिक जागा निवडून येतील, असा विश्वास अनेकांना वाटत होता. एकनाथ शिंदे यांचा पक्ष त्यांनी लढवलेल्या 90 जागांपैकी 40 ते 50 जागा सहज जिंकेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटत होता. मात्र, प्रत्यक्षात शिंदे गटाला फक्त 28 जागा मिळून त्यांची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. तसेच भाजपची मतेही शिंदे सेनेच्या उमेदवारांना ट्रान्सफर झाली नाहीत. तर दुसरीकडे 2017 च्या निवडणुकीत भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत यामध्ये फक्त 6 जागांची भर पडली.
मुंबईत कोणत्या पक्षाल किती जागा मिळाल्या?
भाजप- 89
ठाकरे गट- 65
शिवसेना- 29
काँग्रेस- 24
एमआयएम-8
मनसे- 6
राष्ट्रवादी काँग्रेस- 3
समाजवादी पार्टी- 2
शरद पवार गट-1
मुंबईत कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळाली?
भाजप- 21.2 टक्के
ठाकरे गट- 13.13 टक्के
शिवसेना- 5 टक्के
काँग्रेस- 4.44 टक्के
एमआयएम-1.25 टक्के
मनसे- 1.37 टक्के
राष्ट्रवादी काँग्रेस- 0.45 टक्के
सपा- 0.28 टक्के
शरद पवार गट- 0.22 टक्के
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant