Breaking News
विनोद पवार सरकारी अनास्थेचा बळी
बुलढाणा - बुलढाण्याच्या जळगाव-जामोद तालुक्यातील आडोळ डॅम परिसरातील गावठाण रस्त्याच्या मागणीसाठी गौलखेड येथील तरुण विनोद पवार यांचा जलसमाधी आंदोलनात मृत्यू झाला, हा सरकारी अनास्थेने घेतलेला बळी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज गौलखेड येथे पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामविजय बुरुंगले, स्वातीताई वाकेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की स्वातंत्र्यदिनी आपल्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना एखाद्या शेतकऱ्याचा जीव जावा, ही आपल्या लोकशाहीला कलंक लावणारी बाब असून शासन-प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे निदर्शक आहे. या दुर्देवी घटनेनंतर जिल्हाधिका-यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन हलगर्जीपणा बद्दल माफी मागितली पाहिजे होती व ते मुजोरी दाखवत आहेत.
सततच्या संघर्षानंतरही शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही. एखाद्या शेतकऱ्याला आपला जीव देऊन मागण्या मांडाव्या लागतात, हे कोणत्याही जबाबदार शासनासाठी लज्जास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व मागण्यांची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी तसेच पवार यांच्या कुटुंबियांना भरघोस मदत करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant