Breaking News
“सरकारचा दुटप्पीपणा आणि सत्तेचा उघड दुरुपयोग!”
मुंबई - राज्यातील सत्ताधारी सरकारचा दुटप्पी आणि भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “रॅपिडो” कंपनीविरोधात फिल्मी स्टाईलमध्ये कारवाई करत, ॲपवरून बुकिंग घेणाऱ्या बाईक सेवा बंद करण्याची भाषा केली होती. स्वतः सरनाईक यांनीच रॅपिडो बाईक थांबवून मोठा गाजावाजा करत ती कारवाई केली होती.
पण खरा चेहरा समोर येण्यासाठी फार वेळ लागला नाही. ज्या कंपनीविरोधात कारवाई करणार असल्याची गर्जना मंत्री महोदयांनी केली होती, तीच रॅपिडो कंपनी आता प्रताप सरनाईक यांच्या पुत्राने आयोजित केलेल्या प्रो. गोविंदा स्पर्धेला प्रायोजक म्हणून उभी राहते!
हा प्रकार म्हणजे लोकांची फसवणूक आहे. विरोधकांवर कारवाई करण्याची नाटकं करायची आणि मग सत्तेचा वापर करून त्याच कंपन्यांना कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी करून घ्यायचं हा भ्रष्टाचार नाही तर काय?
यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे. “ही सरकारची ढोंगी नैतिकता आणि नैतिक दिवाळखोरीचा सर्वोच्च टप्पा आहे. सामान्य नागरिकांना नियम दाखवायचे आणि आपल्या राजकीय सोयीसाठी त्याच कंपन्यांसोबत एक आर्थिक देवाणघेवाण करायची हीच भाजप सरकारची ‘डबल स्टँडर्ड’ राजकारणाची ओळख आहे.”
प्रश्न उपस्थित होतात जर ती कंपनी कायद्याचे उल्लंघन करत होती, तर आता तिच्या प्रायोजकत्वाचा स्वीकार का?कायदा सामान्य नागरिकांसाठी वेगळा आणि मंत्र्यांच्या घरच्यांसाठी वेगळा का? एका हातात कारवाईची तलवार आणि दुसऱ्या हातात ‘डील’ साइन करण्याचे पेन?
अॅड. अमोल मातेले यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुली आव्हाने दिली आहेत “जर पारदर्शकता आणि नैतिकता शिल्लक असेल तर या प्रकाराची चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा!”
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे