Breaking News
ओला-उबरला थेट टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र सरकार सज्ज; परिवहन मंत्र्यांनी केली भव्य योजनेची घोषणा
Pratap Sarnaik: मराठी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने अॅप आधारित प्रवासी वाहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत रिक्षा, टॅक्सी आणि ई-बाईकसारख्या सेवा खासगी कंपन्यांकडून पुरवल्या जात होत्या. मात्र आता परिवहन विभागाच्या पुढाकाराने ही सेवा सुरू करण्यात येणार असून, तिच्यासाठी ‘जय महाराष्ट्र’, ‘महा-राईड’, ‘महा-यात्री’, ‘महा-गो’ अशा पर्यायी नावांचा विचार सुरू आहे. याबाबतची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अंतिम संमतीनंतर हे शासकीय ॲप लवकरच सुरु करण्यात येईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी’ आणि ‘मित्र’ या संस्थांबरोबरच काही खासगी कंपन्यांशी संवाद सुरू आहे. ॲपमध्ये पारदर्शक व्यवस्था राहावी यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात येणार असून, लवकरच हे ॲप तयार होईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मराठी युवक-युवतींना आर्थिकदृष्ट्या विशेष मदत
या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी युवक-युवतींना आर्थिकदृष्ट्या विशेष मदत दिली जाणार आहे. बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, मुंबई बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी 10 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई बँकेच्या सहाय्याने बेरोजगार तरुणांना आर्थिक मदतीचा लाभ मिळेल. यासोबतच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त जाती महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्था 11 टक्के व्याजाचे अनुदान परतावा स्वरूपात देतील. त्यामुळे हे कर्ज जवळपास बिनव्याज असल्यासारखे ठरेल, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
शासकीय ॲपची नियमावली अंतिम टप्प्यात
केंद्र सरकारच्या अॅग्रीगेटर धोरणानुसार या शासकीय ॲपची नियमावली अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सध्या अनेक खाजगी कंपन्या परवानगी नसलेल्या ॲप्सद्वारे मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असून, त्याद्वारे चालक आणि प्रवाशांकडून आर्थिक शोषण केले जात आहे. मात्र सरकारकडे आवश्यक मनुष्यबळ, आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे शासनाच्याच वतीने हे ॲप विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे या ॲपचा लाभ प्रवाशांसोबतच वाहनचालकांनाही होणार आहे.
5 ऑगस्टला एक महत्त्वपूर्ण बैठक
या संदर्भात येत्या 5 ऑगस्ट रोजी मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीस आमदार प्रवीण दरेकर, तंत्रज्ञ व संबंधित शासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. या बैठकीत ॲपच्या अंतीम प्रारूपावर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे