Breaking News
किल्ले रायगडावरील शिवकालीन पर्जन्यमापक यंत्राची दूरवस्था !
महाड -छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगड वरील ऐतिहासिक दगडी बांधकाम असलेले शिवकालीन पर्जन्यमापक यंत्र काळाच्या ओघात ढासळू लागले असून सुमारे 300 वर्षापूर्वीचे या पर्जन्यमापक यंत्राची दूरवस्था झाली असून गडावरील हे पर्जन्यमापन यंत्र रायगड संवर्धनात पुन्हा उभे केले जावे अशी लाखो शिवभक्तांकडून मागणी केली जात आहे. मात्र पुरातत्त्व खाते आता तरी जागे होणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा रायगड किल्ल्याचा समावेश झाल्याने शिवप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या असून रायगडावरील अनेक वास्तु प्रकाशझोतात येण्यास यामुळे मदत होणार आहे.
आज २१ व्या शतकात आधुनिक पद्धतीची यंत्रणा वापरून पर्जन्यमापन केले जाते आणि पावसाचा अंदाज बांधला जातो. परंतु सुमारे ३०० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकाळात आणि त्यापूर्वी देखील पारंपारिक पद्धतीने पर्जन्यमापन केले जात असल्याचे . या पर्जन्यमापक यंत्राच्या इतिहासातून समोर आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर देखील अशा प्रकारे शिवकालीन पर्जन्यमापक अस्तित्वात असताना मात्र त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम दगडात बनवलेले पर्जन्यमापक यंत्र कुशावर्त तलावाजवळ मंदिराच्या मागे बांधून घेतले. हे पर्जन्यमापक दगडी बांधकामातील असून याच्या तीन बाजू भिंतीच्या आहेत तर एक बाजूने पाण्याचा मार्ग दिसून येतो. वरील बाजूस तीन छिद्र ठेवण्यात आले आहेत. या छिद्रातूनच पावसाचे पाणी आत जाऊन पारंपरिक पद्धतीने पावसाचे मोजमाप केले जात होते. या पर्जन्यमापकाची सद्या दुरवस्था झाली आहे.नव्या अभ्यासातून हे पर्जन्यमापक असल्याचे समोर आले आहे.
शिवकाळामध्ये शेतीच्या पीकपाण्याचे नियोजन करण्यासाठी त्या काळात हे अतिशय सुंदर असे दगडी पर्जन्यमापक रायगडावर बसविण्यात आले असावे असा अंदाज बांधला जातोय. हे पर्जन्यमापक आहे हे रायगड पाहण्यासाठी आलेले पर्यटक, इतिहासाचे अभ्यासक दुर्गप्रेमी मंडळींना माहीत नव्हते. रायगड अभ्यासक व संशोधक गोपाळ चांदोरकर यांच्या ते दृष्टीस पडले. त्यांनी आपल्या ‘वैभव रायगडचे’ या पुस्तकात या पर्जन्यमापकाचे मोजमाप व कार्यप्रणाली नकाशासह उलगडून दाखविले आहे. वैभव रायगडाचे मध्ये याचा प्रथम उल्लेख केला आहे.तथ श्रीमत् रायगिरौ या पुस्तकात याबाबत विस्तृत विवेचन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले रायगडावर पाणी नियोजन उत्तम केले होते. गडावर गंगासागर, हत्तीतलाव, कुशावर्त तलाव, आणि इतर अनेक बंधारे बांधून . त्याकाळी पाण्याचे नियोजन केले होते. आता मात्र किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा शिवजयंती उत्सव साजरे होत असताना प्लॅस्टिकच्या बाटल्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली ही नामुष्की असल्याची चर्चा आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडच्या संवर्धनाच्या माध्यमातून या तलावांचे योग्य प्रकारे संवर्धन केले जात आहे .वर्षाला सरासरी किती पाउस पडतो हे पर्जन्यमापकामुळे समजून येते आणि रायगडावर किती तलाव लागतील, त्यांची खोली किती ठेवायची, पाणी किती पुरेल याचा अंदाज घेतला जात होता. त्या काळात देखील शेती हे उदरनिर्वाह करण्याचे साधन होते. राज्याचा कोष देखील शेती उत्पन्नावर अवलंबून होता. त्यामुळे पीकपाण्याचे नियोजन या पर्जन्यमापक यंत्रणेच्या माध्यमातून केले जात होते. याकरिता हे पर्जन्यमापक बांधण्यात आल्याचे सांगितले जाते.
किल्ले रायगडावरील दूरवस्था झालेल्या या पर्जन्यबाबत यंत्राचे संवर्धन करून ही वास्तू जतन केली जावी अशी पर्यटक व शिवप्रेमींची मागणी आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade