Breaking News
हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, म्हणत ठाकरेंना डिवचले
मुंबई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा वर्धापन दिन उद्या, गुरूवार १९ जून रोजी वरळीत साजरा केला जाणार आहे. या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली असून हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, असे सांगत वाघासोबत चालणारे एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र आपल्या समाज माध्यम खात्यावरून प्रकाशीत केले आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत भरघोस मते मिळाली. तर उद्धव ठाकरे गटाला अवघ्या काही जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे व्यंगचित्रांच्या माध्यमातून ठाकरे गटाला डिवचण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.
शिवसेनेचा वर्धापन दिन गुरूवारी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्त वरळीतील एनएससीआय डोम येथे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिकांना संबोधित करतील. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या वर्धापन दिनाला विशेष महत्व आहे. यावेळी एकनाथ शिंदे हे पक्षाची भूमिका, पक्षाचे स्थानिक पदाधिकारी घोषीत करतील अशीही चर्चा रंगली आहे. मात्र त्याचवेळी वर्धापन दिनानिमित्त अस्सल ठाकरे शैलीत शिवसेनेच्या वतीने व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, असा मजकूर त्यावर नमूद आहे. सोबतच शिवसेनेचा वाघ आणि सोबतच चालणारे एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर भगवा ध्वज तसेच पाठीशी महाराष्ट्र दाखवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्राशी जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी असल्याचे सिद्ध झाले आहे, असे एकनाथ शिंदे वारंवार आपल्या भाषणात सांगत असतात. तोच आशय या व्यंगचित्रातून देण्यात आला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाने हिंदुत्व सोडले असल्याचा आरोपही होतो, याच हिंदुत्वाचा नारा एकनाथ शिंदे यांनी यापुढेही कायम राहील, असाच संदेश या व्यंगचित्राच्या माध्यमातून दिल्याची चर्चा रंगली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर