Breaking News
३५२ व्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी होणार रेकॉर्ड ब्रेक गर्दी
महाड - येत्या ६ जून रोजी किल्ले रायगडावर प्रतिवर्षाप्रमाणे ३५२ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असून यावर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सोहळ्याकरता राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून लाखो शिवभक्त दाखल होत असतात. या शिवभक्तांच्या सोयी सुविधांसाठी रायगडावर प्रशासनामार्फत जय्यत तयारी चालू केली गेली आहे.
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या तारखे नुसार राज्याभिषेक सोहळ्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मागील वर्षीचा गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या उद्देशाने राज्याच्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र खानदेश यासह पश्चिम महाराष्ट्र व मुंबई, ठाणे, पुणे यासहित रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लाखो शिवभक्त यंदा रायगडावर पाच जून पासून दाखल होणार आहेत.
मागील वर्षी शासकीय आकडेवारीनुसार चार लाखाच्या वर शिवभक्तांनी या शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजेरी लावली होती त्याच धर्तीवर यंदा शिवभक्त रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला दाखल होणार असले तरी चालू वर्षी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीने केलेल्या आवाहनानुसार यंदा गर्दीचा विक्रम मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
किल्ले रायगड आणि परिसरामध्ये सुमारे २००० पोलिसांसह सातशे कर्मचारी तैनात राहणार आहेत.
या सोहळ्याकरता शिवभक्तांची गर्दी वाढतच चालली आहे यामुळे गडावर आणि परिसरामध्ये प्रशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गेली काही दिवस प्रशासनामार्फत सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. यावर्षी देखील लाखो शिवभक्त गडावर दाखल होतील अशी अपेक्षा आहे यामुळे प्रशासनामार्फत जय्यत तयारी सुरू केली गेली आहे. या सोहळ्यासाठी २००० पोलीस किल्ले रायगड आणि परिसरामध्ये तैनात राहणार आहेत, तर ७०० शासकीय कर्मचारी आणि हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक या ठिकाणी काम करणार आहेत.
रायगड जिल्ह्यात पहिल्या महिला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून दाखल झालेल्या आंचल दलाल यांनी पदभार स्वीकारतात रायगड किल्ल्याचा दौरा करून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कोणत्या उपाययोजना करता येतील व मागील वर्षी राहिलेल्या त्रुटी बाबत आढावा घेतला शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त दोन पोलीस उपाधीक्षक, ११ पोलीस उपविभागीय अधीकारी, २८ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक, १४० पोलीस उपजिल्हाध्यक्ष, ९०० पोलीस कर्मचारी १३५ वाहतूक पोलीस तसेच पोलीस दलाची विविध पथके मागील वर्षी किल्ले रायगड परिसरात दाखल झाली होती त्यामध्ये चालू वर्षी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .
गडावर पिण्याच्या पाण्याची असुविधा होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात पुरवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पाण्याच्या टँकरचे देखील नियोजन करण्यात आले आहे. वाहनांची पार्किंग करण्यासाठी प्रशासनाकडून कोंझर आणि पाचाड येथे सुविधा केलेली आहे. या ठिकाणी शिवभक्तांनी आपली वाहने पार्क करून तेथून एसटीने रायगड कडे सोडण्यात येणार आहे. महाड एसटी आगाराकडून याकरिता एसटी बसेस मागवण्यात आलेले आहेत. आरोग्य विभागाचे पथके देखील या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. चित्त दरवाजा येथून पायी चालत जाणाऱ्या शिवभक्तांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या सुविधेसाठी गडावर आणि पायरी मार्गावर वैद्यकीय पथके आणि कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर