Breaking News
श्रीक्षेत्र चौंडी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून नावरुपास येईल…
चौंडी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 31 मे रोजीच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा न्यायप्रिय राज्यकारभार, प्रजाहितदक्षता, आक्रमकांनी उध्वस्त केलेल्या मंदिरांचे त्यांनी केलेले पुन:निर्माण आणि 18 व्या शतकातील त्यांचे सांस्कृतिक पुनरुत्थानाचे कार्य आपल्याला चिरस्फुर्तीदायी आहे.
चौंडी येथील विकास आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास उप मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिल्याने येत्या तीन वर्षात कामे पूर्ण होऊन श्रीक्षेत्र चौंडी एक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून नावरुपास येईल, असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारची मंत्रीपरिषद बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीचे औचित्य साधून 06 मे, 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी म्हणजे श्रीक्षेत्र चौंडी जि.अहिल्यानगर येथे पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाने घेतलेले श्रीक्षेत्र चौंडी येथील स्मृतीस्थळ विकास आराखडा संदर्भातील महत्वपूर्ण निर्णय दिनांक 06 मे, 2025 रोजी घोषित केले. राज्य मंत्रीमंडळाने या बैठकीत राज्यातील मंदिरांचा जीर्णोध्दार करण्यासाठी 5500 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.
उप मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी चौंडी येथील विकास आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिल्याचे जाहिर केले आहे. यामुळे श्रीक्षेत्र चौंडी एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपास येईल. श्रीक्षेत्र चौंडीचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता पुरातत्वीय जाण असलेल्या व्यक्ती आणि संस्थांकडूनच विकास आराखड्यातील कामे 31 मे, 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे अहिल्यानगर येथे उभारण्यात येत असलेले वैद्यकीय महाविद्यालय तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव येथील सभागृह इमारत उभारणी यास देखील प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयांबद्दल सर्व संबंधितांचे श्रीक्षेत्र चौंडीचे भूमिपुत्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मातृकुलाकडून नऊवे वंशज महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी अभिनंदन करुन आभार मानले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant