Breaking News
महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानीत विविध कार्यक्रम
नवी दिल्ली - महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिवस गुरूवारी 1 मे रोजी साजरा होणार आहे या निमित्ताने राजधानी दिल्लीत विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहे.
कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपरनिक्स मार्गावरील महाराष्ट्र सदनांमध्ये सकाळी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांचा हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न होईल.
दिल्लीतील उपराज्यपाल कार्यालयातर्फे सायंकाळी महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना, मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रमुख हा विशेष कार्यक्रम होणार आहे.
यावेळी दिल्लीत विविध क्षेत्रांत कार्यरत मराठी भाषिक व्यक्तींशी संवाद साधून त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतील. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे प्रदर्शन या ठिकाणी होईल.
कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याला उजागर करणारा खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यासोबतच, महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याच्या सहकार्याने आणि कोकण हापूस आंबा उत्पादक संघ, देवगड, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 3 मे दरम्यान भौगोलिक मानांकन प्राप्त हापूस आंब्याचे विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्राचा सुगंधी राजा’ हापूस आंब्याची खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी दिल्लीकरांना उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांत मराठी आणि अमराठी भाषिक दिल्लीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा आणि सांस्कृतिक वैभव सर्वांपर्यंत पोहोचणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant