Breaking News
अबू आझमीना पुढे करून सत्ताधाऱ्यांनी टाळली मुंडेंवरील चर्चा
मुंबई - महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर त्या प्रकरणावरील चर्चा सहभागृहात होऊ नये यासाठी आज सत्तारूढ सदस्यांच्या वतीने औरंगजेबाबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य समोर करून सभागृहाचे कामकाज अक्षरशः बंद पाडले. सभागृहामध्ये आज प्रचंड गदारोळ झाल्यामुळे सुरुवातीला अनेक वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर शेवटी अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.
धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मीक कराड यांच्या बाबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या बाबतचा दबाव प्रचंड वाढला होता. काल सायंकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा होऊन अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज घेण्याचे निश्चित झाले होते . त्यानुसार आज मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला, आपण राजीनामा स्वीकारला असून पुढील कारवाईसाठी तो राज्यपालांकडे पाठवला आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
मात्र मुंडे यांचा विषय सभागृहामध्ये विरोधक उपस्थित करतील ही शक्यता गृहीत धरून सत्तारूढ सदस्यांनी कालचा अबू आजमी यांच्या वक्तव्याचा मुद्दा सभागृहात लावून धरला. काल अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होतात अशा पद्धतीचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी सत्तारूढ बाजूच्या सदस्यांनी आज सभागृहामध्ये जोरदारपणे लावून धरली.
यामुळे सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ झाला विरोधी पक्षांनी देखील अबू आजमी यांना अटक करून दाखवावेच असे आव्हान सरकारला दिले. या सगळ्या प्रकारामध्ये दोन्ही बाजूचे सदस्य आपापल्या जागा सोडून पुढे आले. त्यांच्या घोषणाबाजी झाली आणि सभागृहामध्ये अनेक वेळा तहकूबी झाल्यानंतर शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केल्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले. यामुळे आझमी यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सत्तारूढ सदस्यांनी धनंजय मुंडे यांच्या बाबतची चर्चा आज सभागृहामध्ये टाळली असे दिसून आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर