Breaking News
नरेंद्र मोदींच्या राजवटीत फक्त उद्योगपती अदानीच सेफ आहेत
मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे.
काँग्रेस मविआच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधी यांची गडचिरोलीमध्ये प्रचारसभा झाली. या सभेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेष बघेल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार नामदेव किरसान, रिपाईंचे नेते राजेंद्र गवई तसेच शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
आपल्या भाषणातून भाजपा सरकारचा समाचार घेत प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाचे हित पाहून मोठ्या संस्था, करखाने, बंदरे, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स विविध राज्यात उभी केली. विकासाच्या कामात काँग्रेस सरकारने कधीच भेदभाव केला नाही. परंतु मागील ११ वर्षांपासून देशात भेदभावाचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारने महाराष्ट्रात येणारे मोठे प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यात पळवून महाराष्ट्राशी भेदभाव केला आहे. देशातील सर्व विमानतळ, बंदरे, कारखाने, जमीन एकाच उद्योगपतीला दिली आहेत. महाराष्ट्रात बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण भरती केली नाही. कंत्राटी पद्धतीने नोकर भरती केली जात आहे. सर्वात जास्त तरुणांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत.
शेतकरी संकटात आहे, त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही, कापसाची मोठ्या प्रमाणात आयात करुन शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव वाढू दिले नाहीत. १० वर्षापासून सोयाबीनचा दर वाढलेला नाही. काँग्रेस सरकार असताना सोयाबीनला ७ ते ८ हजार रुपये भाव होता आज तो फक्त ४ हजार रुपये आहे. कांदा निर्यातबंदी केली होती, त्यामुळे ५० लाख टन कांदा बाद झाला, दूधाला भाव नाही, संत्र्याला भाव नाही.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत नाही आणि शेती साहित्यावर मात्र जीएसटी लावून शेतकऱ्याला लुटले जात आहे. शाळेसाठी लागणाऱ्या वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. आदिवासांचे हक्क अबाधित राखण्यासाठी काँग्रेस सरकारने पेसा कायदा बनवला. आज भाजपाच्या राज्यात आदिवासींवर अत्याचार होत आहेत. महाराष्ट्रातील ४ लाख आदिवासींनी जमिन पट्ट्यांसाठी अर्ज केले त्यातील २ लाख बाद करण्यात आले. तर देशभरातून २२ लाख आदिवासींचे अर्ज बाद केले असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
महाराष्ट्रातील सरकार मोदी आणि भाजपाने चोरले. सरकार स्थापनेच्या बैठकीत उद्योगपती अदानी उपस्थित होते अशी चर्चा बाहेर आली आहे. आता विधानसभा निवडणुकीत काळजीपूर्वक मतदान करा उद्योगपतींच्या हितासाठी काम करणारे नाही तर जनतेसाठी काम करणारे सरकार निवडून द्या, असे आवाहनही प्रियंका गांधी यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade