Breaking News
विजय गोखले यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान
ठाणे - ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर स्पृहा दळी हिला गंधार बालकलाकार पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेत्री,
बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
गंधार या संस्थेतर्फे शुक्रवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात गंधार गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजदत्त म्हणाले की, कला ही अपूर्ण असते ती कधी पूर्णत्वाला जाईल हे कोणीच सांगू शकत नाही आणि ते खरे आहे. कोणत्याच कलावंताने आपल्या पाठीवरती आपणहून शाबासकी देऊ नये. उत्कृष्ट कलाकार तोच जो स्वतःचे समाधान घेत नाही यापेक्षा अधिक चांगलं करता आले असते यातूनच कलावंत मोठा होत जातो आणि तेच होत राहणेही कलेची आणि कलावंतांची गरज आहे.
पुरस्काराला उत्तर देताना गोखले म्हणाले की, पुरस्कारांनी एक प्रकारे कलावंताला ऊर्जाच मिळते आणखीन काहीतरी करावे असे वाटते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे म्हणाले की, रंगभूमीवर वावरण्यासाठी लागणारी शिस्त हे देखील शिकवले पाहिजे ज्यावेळेला तुम्ही रंगभूमीसाठी जगतात म्हणजेच तुम्ही समाजासाठी जगत असतात आत्ताच्या पिढीला इतिहास समजून सांगण्याची गरज आहे. अभिनयासारख्या शाळा दुकानासारख्या उघडल्या जात आहेत पण जिथे चांगले शिकवतात तिथेच विद्यार्थ्यांनी जावे. इतिहास वाचता आला पाहिजे पाहता आला पाहिजे आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे.
ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी पालकांना आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्याचा सल्ला दिला. दरम्यान बालनाट्य संस्था पुरस्कार यावर्षी न्यू नटराज थिएटर, पुणे (संस्था प्रमुख, दिलीप नाईक) या संस्थेला देण्यात आला. अंशुमन विचारे, जान्हवी किल्लेकर, गौरव मोरे यांना युवा पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, गजानन महाराज मठाचे विनय जोशी, विजू माने, अभिनेते आशुतोष गोखले, प्रकाश निमकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा मंदार टिल्लू तर अध्यक्षीय भाषण प्रा. प्रदीप ढवळ यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गंधारच्या बाल कलाकारांनी नाट्यरंग भूमीवरचा प्रवास आपल्या कलाकृतीतून उलगडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री प्रधान दामले यांनी केले.
इतर पुरस्कार विजेते
विशेष ज्युरी पुरस्कार मानव्य संस्था आणि प्रेरणा थिएटर आणि अंतरंग:
सर्वोत्कृष्ट नेपथ्य पुरस्कार : आशिष पवार
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : श्याम चव्हाण आणि सुधीर फडतरे
सर्वोत्कृष्ट रंगभूषा पुरस्कार : दीपक कुंभार
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : मयुरी माकूडे
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : अहना दिंडोरकर
सर्वोत्कृष्ट लेखक : शलाका कुलकर्णी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : रश्मी घुले
सर्वोत्कृष्ट बालकलाकार मुलगा : श्रीजय देशपांडे
सर्वोत्कृष्ट बालकलाकार मुलगी: अरण्या जगताप
सर्वोत्कृष्ट बालनाट्य: आदिम
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar