Breaking News
भरतनाट्यम नृत्यांगना पद्मविभूषण यामिनी कृष्णमूर्तींचे निधन
नवी दिल्ली - ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना पद्मविभूषण डॉ.यामिनी कृष्णमूर्ती (84) यांनी काल नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. कृष्णमूर्ती यांचे व्यवस्थापक आणि सचिव गणेश यांनी पीटीआयला याविषयी माहिती दिली. त्यांनी असे सांगितले की, यामिनी गेल्या काही महिन्यांपासून वयाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होत्या. शिवाय गेल्या सात महिन्यांपासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. डॉ. कृष्णमूर्ती यांच्या जाण्याने भारतीय कलाविश्वाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने भरतनाट्यम, ओडिसी आणि कुचिपुडी नृत्यविश्वात शोककळा पसरली आहे.
डॉ यामिनी कृष्णमूर्ती एक प्रतिष्ठित भारतीय शास्त्रीय नृत्यांगना होत्या, ज्यांना भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्य प्रकारातील प्रभुत्वासाठी ओळखले जाते. २०१६ साली भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मविभूषण’ त्यांना प्रदान करण्यात आला होता. त्याआधी २००१ साली त्यांना ‘पद्मभूषण’ या भारताच्या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले, तर १९६८ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. अनेक दशकांपासून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी जागतिक स्तरावर भारतीय कला मोठ्या दिमाखात सादर केली होती.
यामिनी कृष्णमूर्ती यांचा जन्म 20 डिसेंबर 1940 रोजी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील मदनपल्ले येथे झाला. मात्र, यामिनी कृष्णमूर्ती यांचे बालपण हे तामिळनाडूमध्ये गेले. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी भरतनाट्यममध्ये पदार्पण केले. भरतनाट्यम क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar