Breaking News
टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता, गोलंदाजांनी पराभवाच्या जबड्यातून विजयश्री खेचून आणली
भारताने अखेर टी20 विश्वचषक स्वतःच्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत रोहित शर्माच्या टीम इंडियाने दुसरा टी20 विश्वचषक भारताला मिळवून दिलाय.
शेवटच्या बॉलनंतर समालोचन करणाऱ्या इरफान पठाणपासून मैदानावर फिरणाऱ्या रोहित शर्मापर्यंत प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या डोळ्यात आश्रू होते. आयपीएलमध्ये ट्रोल झालेल्या हार्दिक पंड्यासाठी हा विजय त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विजय होता आणि जागतिक गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जसप्रीत बुमराहसाठी हा विश्वविजय तेवढाच महत्त्वाचा होता.
...आणि इथे मॅच फिरली!
पंधराव्या ओव्हर मध्ये अक्षर पटेलने 24 धावा दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 30 बॉलमध्ये 30 धावा हव्या होत्या. ओव्हर संपल्यानंतर अक्षर पटेलने वर्ल्डकप फायनलमध्ये भारतीय गोलंदाजाची सगळ्यात महागडी ओव्हर स्वतःच्या नावे केली. हताश झालेल्या कर्णधार रोहित शर्माने जगातला अव्वल गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या हातात बॉल दिला आणि दक्षिण आफ्रिकेकडे झुकलेला वर्ल्डकप भारताकडे परत येताना दिसू लागला.
सोळाव्या ओव्हरमध्ये बुमराहने फक्त चार धावा खर्च केल्या आणि मोक्याच्या क्षणी कच खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज गडबडबले.
5 षटकार खेचल्या हेनरीक क्लासेनला हार्दिक पंड्याने उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू छेडायचा मोह झाला आणि सतराव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर क्लासेन आउट झाला.
सतराव्या ओव्हरमध्ये पंड्याने फक्त चार धावा केल्या आणि मैदानात उभ्या असलेल्या डेव्हिड मिलर आणि मार्को यान्सन यांच्यावरचा दबाव वाढला. आता प्रश्न होता बुमराह शेवटची ओव्हर कधी टाकतो?
रोहित शर्माने शेवटची जोखीम घ्यायची ठरवली आणि अठरावी ओव्हर जसप्रीत बुमराहला दिली.
जसप्रीतने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकवून दिलेल्या मार्को यान्सनचा त्रिफळा उडाला.
अठराव्या ओव्हरमध्ये बुमराहने फक्त दोन धावा दिल्या आणि शेवटच्या दोन ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 20 धावांची गरज होती.
या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट घेतलेला अर्शदीप सिंगने एकोणिसाव्या ओव्हरसाठी बॉल हातात घेतला आणि गोलंदाजीला सुरुवात केली. त्याच्या समोर होता भारताविरुद्ध कसोटी सामन्यात धावा केलेला केशव महाराज, अर्शदीपने अतिशय शिस्तबद्ध मारा करत एकोणिसाव्या ओव्हरमध्ये फक्त चार धावा दिल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावा हव्या होत्या.
शेवटची ओव्हर टाकण्याची जबाबदारी आयपीएलमध्ये ट्रोल झालेल्या हार्दिक पंड्यावर येऊन पडली आणि हार्दिकने पहिल्याच चेंडूवर दक्षिण आफ्रिकेची शेवटची आस असणाऱ्या डेव्हिड मिलरला आउट केलं.
16 धावा हव्या असल्याने डेव्हिड मिलरने लॉन्ग ऑफला चेंडू फटकावला आणि सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर त्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा झेल घेतला.
कानात नवज्योत सिंग सिद्धू म्हणत होता की "हार की जबडे में हात डालके भारत ने जीत खिंच कर लाई है."
हार्दिक पंड्याच्या दुसऱ्या बॉलवर कागिसो रबाडाच्या बॅटची कड घेऊन बॉल सीमारेषेकडे गेला आणि आफ्रिकेला चौकार मिळाला.
आता शेवटच्या चार बॉलमध्ये 12 धावांची गरज होती आणि हार्दिकने पुन्हा एकदा डॉट बॉल टाकला आणि चोकर्सचा शिक्का बसलेल्या आफ्रिकेला पराभवाच्या जवळ ढकललं.
3 बॉलमध्ये 12 धावांची गरज असताना हार्दिक पंड्याने मिड विकेटला एक धाव दिली आणि शेवटच्या 2 बॉलमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 10 धावा हव्या होत्या. समोर होता केशव महाराज आणि गोलंदाजी करत होता भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या.
हार्दिकने बॉल हातात घेतला, धावपट्टीकडे धाव घेतली आणि एक वाईड बॉल टाकला.
आता दोन बॉलमध्ये 9 धावांची गरज होती. हार्दिकने या बॉलवर कागिसो रबाडाला आउट केलं आणि भारताचा विजय निश्चित केला.
2013 नंतर भारत पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकणार होता, गेलेला वर्ल्डकप हार्दिक आणि जसप्रितने भारताच्या हातात आणून ठेवला होता आणि यात अतिशय कंजूस गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीपचाही तेवढाच वाटा होता.
कधीकाळी बलाढ्य फलंदाजीसाठी ओळखला जाणारा भारतीय संघ आणि भेदक गोलंदाजीचा जोरावर विश्वविजेता बनला होता.
दक्षिण आफ्रिकेचं विश्वविजयाचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं होतं.
बुमराह-हार्दिकने फिरवला सामना
हेन्री क्लासेननं भारताच्या तोंडातून घास हिसकावल्यासारखा सामना हिसकावला होता. अक्षर पटेलच्या ओव्हरमध्ये तुफान फटकेबाजी केली. त्यामुळं सामना भारतानं जवळपास गमावला अशी स्थिती निर्माण झाली होती.
कारण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये 30 धावा हव्या होत्या. पण त्यानंतर रोहितनं त्याच्या भात्यातसं सर्वात यशस्वी अस्त्रं काढलं ते म्हणजे बुमराह.
रोहितनं 16 व्या ओव्हरसाठी बुमराहकडे चेंडू सोपवला. बुमराहची ओव्हर क्लासेन आणि मिलर यांनी सावधपणे खेळली. या ओव्हरमध्ये विकेट आली नाही पण धावा फक्त चार आल्या. त्यामुळं एक प्रकारचा दबाव निर्माण झाला.
त्यानंतर 17 व्या ओव्हरसाठी या स्पर्धेत ऑलराऊंडर म्हणून भारतासाठी जोरदार कामगिरी केलेल्या हार्दिकच्या हाती चेंडू आला. बुमराहच्या ओव्हरमध्ये निर्माण झालेला दबाव कामी आला आणि हार्दिकनं क्लासेनला बाद केलं. त्याच ठिकाणी सामना जवळपास भारताकडे फिरला.
त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये बुमराहनं यान्सेनला बाद केलं आणि भारताच्या हातून निसटलेला सामना जवळपास पुन्हा खेचून आणला.
त्यानंतर या यशाच्या शिखरावर झेंडा रोवण्याचं काम केलं ते सूर्यानं घेतलेल्या मिलरच्या अप्रतिम झेलनं. तिथंच भारतानं सामना जवळपास जिंकला होता.
जसप्रीत बुमराह ठरला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट
फलंदाजांचा दबदबा असणाऱ्या टी20 प्रकारात जसप्रीत बुमराहला 2024 च्या विश्वचषकाचा मालिकावीर म्हणून गौरविण्यात आलं.
मालिकावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला की, "30 बॉलमध्ये 30 धावा हव्या होत्या तेंव्हा मला वाटलं की बॉल रिव्हर्स स्विंग होऊ शकतो. बॉल रिव्हर्स स्विंग होत होता आणि मी चांगल्या टप्प्यावर बॉल टाकण्याचा निर्णय घेतला. मला आनंद आहे मला अपेक्षित यश मिळालं."
बुमराह म्हणाला की, "सहसा मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो परंतु आज माझ्याकडे शब्दच नाहीत, मी सामन्यानंतर रडत नाही पण आज माझ्या भावनांनी माझा ताबा घेतला आहे. आम्ही अडचणीत होतो पण तिथून आम्ही हा सामना जिंकू शकलो हे अविश्वसनीय आहे. माझे कुटुंब येथे आहे, आम्ही गेल्या वेळी विजयाच्या जवळ आलो होतो आणि आता आम्ही विश्वचषक जिंकला आहे. मी नेहमी एका बॉलचा आणि एका ओव्हरचा विचार करतो."
हा माझा शेवटचा टी20 विश्वचषक - विराट कोहली
विजयानंतर प्रतिक्रिया देताना विराट कोहली म्हणाला की, "हा माझा शेवटचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप होता. आम्हाला हेच मिळवायचं होतं.
एखाद्या मालिकेत तुम्हाला धावा मिळत नसतात आणि अचानक सगळं काही तुमच्या बाजुंन घडू लागलं, ही देवाची कृपा आहे. हा माझा शेवटचा टी ट्वेंटी सांना होता.
आम्हाला आयसीसी स्पर्धा जिंकायची होती आणि ते स्वप्न पूर्ण झालं. आता तरुणांना संधी देण्याची वेळ आली आहे. आता त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्याची वेळ आली आहे. हा आमच्यासाठी फार मोठा प्रतीक्षेचा काळ होता. मला, रोहित आम्हाला सर्वांनाच सगळं काही मिळालं अशी भावना आहे."
हा विजय आमच्या 3-4 वर्षांची मेहनत - रोहित शर्मा
विश्वचषक स्वीकारण्यापूर्वी भारताचा विजयी कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "आम्ही मागच्या 3-4 वर्षांमध्ये केलेली मेहनत शब्दात सांगणं कठीण आहे. आम्ही एक संघ म्हणून खूप मेहनत केली आहे. पडद्यामागे बरंच काही चाललं आहे.
आम्ही अशा दबावात बरेच सामने खेळलो आणि बऱ्याचदा आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. पण तुम्ही पराभवाकडे ढकलले जात असताना कसं खेळायचं हे माझ्या संघातल्या प्रत्येक खेळाडूला माहित होतं. आमची हा विश्वचषक जिंकण्याची खूप तीव्र इच्छा होती. मला माझ्या खेळाडूंचा खूप अभिमान आहे.
विराटच्या फॉर्मवर कोणालाही शंका नव्हती. त्याच्याकडे असलेली गुणवत्ता आम्हाला माहीत आहे, महत्त्वाच्या प्रसंगी मोठे खेळाडू उभे राहतात. विराटने आमच्यासाठी ते राखून ठेवलं होतं."
जसप्रीत बुमराह बद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, "मी त्याला इतकी वर्षे खेळताना पाहिले आहे, पण तो हे कसे करतो हे मला देखील माहित नाही. तो एक मास्टरक्लास आहे. तो त्याच्या कौशल्यांची पाठराखण करतो आणि त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास भरलेला आहे आणि भारतातील सर्व चाहत्यांना मला सांगायचं आहे की मित्रांनो रात्र झाली आहे मला माहित आहे पण मला खात्री आहे की ते सर्व हे पाहण्यासाठी तुम्ही खूप आतुर असाल."
अंतिम सामन्यातील दोन्ही संघ
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
दक्षिण आफ्रिकेचा संघ : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी
जून 2023मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला, नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरला आहे.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ कोणत्याही प्रकारातील विश्वचषकाचा पहिलाच अंतिम सामना खेळत आहे.
मागच्या तीन दशकांमध्ये दक्षिण आफ्रिकेला एकही विश्वचषक जिंकता आलेला नाही. ज्या प्रमाणे दक्षिण आफ्रिकेला आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा अनुभव नाही अगदी त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असलेल्या एडन मार्करमने कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमध्ये एकदाही पराभवाच तोंड बघितलेलं नाही.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांत याआधी काय घडलंय?
या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 26 टी-20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 14 सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने 11 सामने जिंकले आहेत.
डेव्हिड मिलरने भारताविरुद्ध 20 सामन्यात 431 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 17 सामन्यात 420 धावा केल्या होत्या आणि सूर्यकुमारने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 सामन्यात 343 धावा केल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE