Breaking News
अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा
महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
Ladki Bahin Yojana : अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा केली.
मुंबई : अर्थमंत्री अजित पवार विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प (Budget 2024) महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना, मुलींचे मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा केली.
अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना मी घोषित करत आहे. महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंब, सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी दिला जाईल. जुलै 2024 पासून अंमलबजावणी सुरू करण्यात येईल."
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
लाभार्थी : 21 ते 60 वय असलेल्या महिला
अट : वर्षाला आवक 2,50,500 पेक्षा कमी
या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जाण्याची शक्यता आहे. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे.
मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
अर्थमंत्री अजित पवारांनी आज राज्याचा उर्वरित अर्थसंकल्प सादर केला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात ठेवून अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली.
राज्यातील शिंदे सरकार लवकरच 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना लागू करण्याची शक्यता आहे. राज्यातील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. अलिकडेच राज्य सरकारनं शासकीय अधिकाऱ्यांचं एक पथक मध्य प्रदेशला पाठवलं होतं. या पथकाद्वारे मध्य प्रदेशमधील 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा अभ्यास करण्यात आला. ही योजना कशी राबवली जाते? त्यासाठी नेमके प्रारूप काय आहे? यासाठी काय-काय तरतूदी काय असतील? याचा या पथकानं अभ्यास केला.
मध्य प्रदेशमधील 'लाडली बहणा योजना' काय आहे?
मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजना लागू केली होती. या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते. या योजनेला मध्य प्रदेशमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याच योजनेच्या जोरावर शिवराजसिंह यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली. महिला मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिली होती. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीतही येथे भाजपने 29 पैकी 29 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांचे हे प्रारूप महाराष्ट्रातही राबवल्यास महायुतीला फायदा होईल, अशी आशा महायुतीच्या घटकपक्षांना असावी.
अर्थसंकल्पातील इतर महत्त्वाचे मुद्दे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE