Breaking News
आमदार मंदा म्हात्रे यांची आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी झाली आहे. राज्यात ओढावलेल्या पूरग्रस्तांना 1 कोटी रुपयांची मदत तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विविध विषयांसंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी रायगड, महाड, चिपळुन, कोल्हापुर, सातारा येथे अतिवृष्टीमुळे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी झाली आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. राज्यभरातून पुरग्रस्तांसाठी मदतकार्य सुरु आहे. नवी मुंबई महापालिकाही नेहमीच मदतकार्यासाठी पुढाकार घेते. या पूरग्रस्तांनाही नवी मुंबई महापालिकेमार्फत 1 कोटी मदत देण्याची मागणी म्हात्रे यांनी केली. नवी मुंबई महानगरपालिका ही श्रीमंत महानगरपालिका म्हणून गणली जात असताना अशा संकटातून त्यांना सावरणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. महापालिकेमार्फत 1 कोटी रुपयांचा निधी तसेच अन्न-धान्य, कपडे, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यास या संकटातून बाहेर येण्यास त्यांना मदत होईल. तसेच पूरग्रस्त कोकणवासियांना खर्या अर्थाने दिलासा मिळेल. महापालिका आयुक्त यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच पूरग्रस्तांना ही मदत पोहचणार असल्याचे त्यांनी सूचित केले. मी माझे 1 महिन्याचे वेतनही पूरग्रस्तांना देणार आहे. त्यामुळे सर्वांनीच पूरग्रस्तांना मदत म्हणून हातभार लावावा, असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya