Breaking News
सप्टेंबर 2020 पासून राज्यभरातून चोरल्या 64 बुलेट
नवी मुंबई : सप्टेंबर 2020 पासून जानेवारी 2021 या कालावधीत राज्याच्या अनेक भागातून बुलेट चोरी करणार्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 64 गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील 1 कोटी रुपये किमतीच्या 44 बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. बुलेटला असलेली वाढती मागणी व चोरी करणे सहज शक्य असल्याने त्यांच्याकडून केवळ बुलेटची चोरी केली जात होती.
लॉकडाऊनमध्ये वाहन चोरीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यात बुलेट चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अपर आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांनी विशेष तपास पथक तयार केले होते. त्यात सहायक निरीक्षक राहुल राख, रुपेश नाईक, राजू तडवी, हर्षल कदम, भगवान तायडे, रोहिदास पाटील, निलेश किंद्रे, शशिकांत जगदाळे, रवींद सानप आदींचा समावेश होता. त्यांनी 22 जानेवारीला वाशी सेक्टर 17 परिसरात सापळा रचला होता. यावेळी सोहेल इम्तियाज शेख (28) व सौरभ मिलिंद करंजे (23) हे संशयास्पदरित्या वावरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बुलेट चोरीच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली. त्यानुसार दुसर्या दिवशी त्यांचा मुख्य साथीदार अमोल ढोबळे (35) याला महापे एमआयडीसी परिसरातून अटक केली. ढोबळे हा टोळीचा सूत्रधार असून तोच बुलेटची चोरी करायचा.
ज्या नव्या कोर्या बुलेटचा हँडल लॉक नसेल अशी बुलेट तो अर्ध्या मिनिटात चोरी करायचा. यासाठी 300 रुपयाच्या इग्निशन किटचा वापर केला जायचा. जी गाडी चोरायची असेल त्याचे किट काढून नवे किट बसवताच ती गाडी चालू व्हायची. इतर दुचाकींच्या तुलनेत बुलेटचे इग्निशन किट बदलणे सहज सोपे असल्याने व मागणी असल्याचा फायदा ते घेत होते. अशा प्रकारे त्यांनी सप्टेंबर 2020 पासून ते जानेवारी पर्यंत राज्यभरातून 64 बुलेट चोरल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ढोबळेचे दोन साथीदार रिकव्हरी एजन्ट बनून चोरीच्या बुलेटची कमी किमतीत विक्री करायचे. यासाठी त्यांनी गाडीच्या बनावट कागदपत्रांसह बनावट आरसी व इन्शुरन्स पेपर देखील तयार केले होते. त्यापैकी 1 कोटी 30 हजार रुपये किमतीच्या 44 बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. नवी मुंबईसह ठाणे, पिंपरी चिंचवड, पुणे, गोवा, अहमदनगर याठिकाणी या गाड्या विकण्यात आल्या होत्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya