अनलॉकनंतर घरफोडी जोरात
चोरट्यांचा हैदोस ; पोलिसांची विशेष पथके
नवी मुंबई : लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर घरफोडया करणारे चोरटे नवी मुंबईत पुन्हा सक्रीय झाले आहेत. या चोरटयांनी मागील काही दिवसांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत हैदोस घातला असून या टोळ्यांनी नवीन पनवेल मधील एका डॉक्टराच्या घरात तब्बल 82 लाखांची तर सीबीडीत 9 लाखांची घरफोडी केल्याचे उघडकिस आले आहे. वाढत्या घरफोडीच्या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
लॉकडाऊनमुळे लपुन बसलेले चोरटे लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर पुन्हा सक्रीय झाले असून त्यांनी बंद घरे हेरुन घरफोडया करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवडाभरात 20 पेक्षा अधिक घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. पोलीस अभिलेखावरील व नव्याने गुन्हे करणार्यांचा शोध घेत आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर आपल्या मुळ गावी गेलेल्या कुटुंबांच्या घरांवर पाळत ठेवुन हे चोरटे त्यांच्या घरातील लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेत असल्याचे दिसून येत आहे. या चोरटयांनी गत आठवडयात नवीन पनवेल येथील डॉ.इनामदार यांच्या घरात घरफोडी करुन तब्बल 82 लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. तसेच सीबीडीत रहाणार्या गजानन भंडारे यांच्या घरात 9 लाख रुपयांची घरफोडी केली आहे. तर पनवेलच्या शिरढोण गावात 5 लाख 62 हजारांची घरफोडी केली आहे.
नवीन पनवेलमध्ये तर एका घरात चोरी करण्यासाठी टेरेसवरुन प्रवेश केला, मात्र टेरेसवरील दरवाजा बंदीस्त असल्याने चोरटयानी या घराला बाहेरुन दुसरे टाळे लावुन तसेच त्याला एम सील लावून या कुटुंबाला घरात डांबून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. सकाळी उठल्यानंतर या कुटुंबाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बाहेरुन बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजार्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार उघडकिस आला. या शिवाय चोरटयांनी कोपरखैरणे, नेरुळ, वाशी एनआरआय, खारघर, व इतर भागात छोटया मोठया अशा अनेक घरफोडया केल्या आहेत. त्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
घरफोडया करणार्या चोरटयांनी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्याच्या कालावधीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 150 घरफोडया करुन लाखोंचा ऐवज चोरुन नेल्याची नोंद आहे. त्यात दिवसा घरफोडीचे 23 तर उर्वरीत 129 रात्रीच्या घरफोडयांची नोंद आहे. यापैकी फक्त 31 गुन्हे उघडकिस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात घरफोडया करणार्या चोरटयाच्या कारवाईत मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
डॉ. रविंद्र इनामदार यांच्या घरात 82 लाखांची घरफोडी
नवीन पनवेल सेक्टर-19 मध्ये डॉ.रविंद्र इनामदार यांचे श्रेयस हॉस्पीटल असून या हॉस्पीटलच्या तिसऱया व चौथ्या मजल्यावर डॉक्टर आपल्या कुटुंबासह रहाण्यास आहेत. डॉ.इनामदार हे प्रत्येक शनिवार रविवारी कुटुंबासह पुणे येथील आपल्या गावी जात असतात. गत 3 ऑक्टोबर रोजी सुद्धा ते आपल्या गावी गेले होते. या दरम्यान, डॉ.इनामदार यांच्या तिसऱया व चौथ्या मजल्यावरील घर बंद होते. याचीच संधी साधुन चोरटयाने जिन्याद्वारे डॉ.इनामदार यांच्या चौथ्या मजल्यावरील दरवाजा उचकटून त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनतर चोरटयाने बेडरुमचा देखील दरवाजा उचकटून लाकडी कपाटातील तसेच लोखंडी तिजोरीतील 3 किलो वजनाचे 30 सोन्याचे बिस्कीट, 20 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 2 लाख रुपयांचे घडयाळ असा तब्बल 82 लाखांचा ऐवज चोरुन नेला. दुसर्या दिवशी सकाळी डॉक्टर घरी परतल्यानंतर घरफोडीचा हा प्रकार उघडकिस आला. या घटनेनंतर खांदेश्वर पोलिसांसह गुन्हे शाखेने या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. अद्याप या घरफोडीतील चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
चौकट
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी विविध कारागृहात बंदीस्त असलेल्या हजारो कैद्यांना तात्पर्त्या जामीनावर मुक्त करण्यात आले आहे. त्यातील चोरटे पुन्हा सक्रीय झाले असण्याची शक्यता आहे. त्यातच नवी मुंबई पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचारी अधिकार्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने आहे त्या पोलीस बळाच्या माध्यमातुन नवी मुंबई हद्दीत गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच नाकाबंदी पेट्रोलिंगचे प्रमाण देखील वाढविण्यात आले आहे. नागरिकांनी देखील सतर्क राहुन पोलिसांना मदत करणे गरजेचे असल्याचे परिमंडळ 1 चे पोलिस उपयुक्त सुुुरेश मेंगडे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya