धुमकेतुपासून बनलेली वस्तु देण्याचे अमिष दाखवून फसवणुक
दुक्कली जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट-1 ची कारवाई
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 25 कोटी रुपये किंमत असलेली व शास्रज्ञांना प्रयोगासाठी उपयुक्त असलेली धुमकेतु पासून बनलेली चंदेरी रंगाची वस्तु फक्त 20 लाख रुपयांमध्ये देण्याचे अमिष दाखवून पनवेल भागातील व्यक्तीकडून 1 लाख रुपये लुबाडणार्या दोघा भामटयाना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा लावून अटक केली आहे. अफसर तायर अली सैय्यद (35) व पोपट काशीनाथ खोमणे (51) अशी या दोघा भामटयाची नावे असून या दोघांनी संपुर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीने अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गुन्हे शाखेकडून या दोघांची कसुन चौकशी करण्यात येत आहे.
या घटनेत फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव जेम्स विल्यम जॉर्ज (49) असे असून ते पनवेलच्या सुकापुर भागात रहाण्यास आहेत. दोन महिन्यापुर्वी जेम्सची आरोपी पोपट खोमणे याच्यासोबत ओळख झाली होती. या ओळखीतून भामटया पोपटने जेम्स सोबत मैत्री वाढविली होती. त्यानंतर पोपटने गत 10 सप्टेंबर रोजी जेम्सला ऐरोली डेपोत बोलावुन त्याच्या ओळखीतल्या व्यक्तीकडे धुमकेतु वरुन पडलेली मौल्यवान वस्तु असल्याचे सांगुन ती वस्तु शास्रज्ञांना प्रयोगासाठी खुप उपयुक्त असल्याचे व शास्रज्ञांकडून अशा वस्तुंचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या वस्तुची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 25 कोटी रुपये इतकी किंमत असुन त्याच्या ओळखीतला व्यक्ती सदर चंदेरी वस्तु 20 लाख रुपयांमध्ये विकत असल्याचे सांगितले होते. तसेच त्याच्याकडे इतकी रक्कम नसल्यामुळे सदरची वस्तु त्याने 20 लाख रुपयांमध्ये विकत घ्यावी, असे जेम्सला सुचवले होते.
सदर वस्तु जेम्सने विकत घेल्यानंतर सदर वस्तु 25 कोटी रुपयात विकून देण्याचे तसेच त्यातील 3 कोटी रुपये त्याला द्यावे लागतील असे देखील पोपटने जेम्सला सांगितले होते. त्यानंतर पोपटने जेम्सला वारंवार फोन करुन सदर वस्तु त्याने लवकर विकत घ्यावी, यासाठी त्याला वेगवेगळी अमिषे दाखविण्यास सुरुवात केली होती. तसेच 20 लाख रुपये नसल्यास 5 लाख रुपयांची टोकन रक्कम त्या व्यक्तीला देण्यासाठी घेऊन येण्यास जेम्सला सांगितले होते. चार दिवसानंतर जेम्स 1 लाख रुपये घेऊन आल्यानंतर पोपटने त्याला कल्याण नाशिक रोडलगत असलेल्या एका कंटेनर यार्डमध्ये नेऊन त्याठिकाणी आरोपी अफसर तायर अली सैय्यद याची भोईर या नावाने भेट करुन दिली. त्यानंतर आरोपी अफसर सय्यद याने त्याच्याकडील सुटकेसमधील चंदेरी रंगाची वस्तु जेम्सला दाखवून त्याला घडयाळ चिकटवून सदर वस्तु खरी असल्याचे भासविले.
त्यानंतर जेम्सने टोकन म्हणून 1 लाख रुपयांची रक्कम आरोपी अफसर सय्यद याला देऊन उर्वरीत 19 लाख रुपये महिन्याभरात देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर घरी परतलेल्या जेम्सने सदर प्रकाराची माहिती आपल्या चुलत्यांना दिल्यानंतर त्यांनी सदर व्यक्ती त्याला मुर्ख बनवित असल्याचे सांगितल्यानंतर जेम्सने पोपटला फोन करुन त्याच्याकडे आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. मात्र त्याने पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जेम्सने नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे धाव घेतल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-1 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल राख, नाईक व त्यांच्या पथकाने जेम्सच्या माध्यमातुन उर्वरीत 19 लाख रुपयांची रक्कम देण्याच्या बहाण्याने दोघा भामटयांना ऐरोली डेपोत बोलावून घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. गुन्हे शाखेने या दोघांकडून 15 हजार 500 रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya