Breaking News
निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही? भाजपा का देत आहे?
मुंबई— महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत पण त्याची मिरची मात्र भाजपाला लागली. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत, त्याची उत्तरे त्यांनी देणे अपेक्षित असताना भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून उत्तरे दिली आहेत. फडणवीस यांचा लेख हास्यास्पद असून राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुद्देसुद उत्तरे देण्याऐवजी टीका करत जनतेला भ्रमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, असे उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या लेखाची चिरफाड केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस व भाजपा युती हीच मतांच्या चोरीचे लाभार्थी आहेत, ते आरोपी आहेत, सत्तेचा मलिदा लाटत आहेत आणि तेच उत्तरे देत आहात, तुम्ही रामशास्त्री प्रभूणेंच्या अविर्भावात वावरू नका, तुमचा कारभार तर घाशिराम कोतवालचा आहे. फडणवीस यांनी दिलेली उत्तरे ही थातूर मातूर आहेत.
फडणवीस हा माणूस अत्यंत खोटारडा आहे. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही. अजित पवार व राष्ट्रवादी बरोबर कधीच जाणार नाही, छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांची जागा जेलमध्येच आहे हे सांगणारे, नारायण राणेंवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणारे हे तेच फडणवीस आहेत जे आज अजित पवार, नारायण राणे व भुजबळांना शेजारी घेऊन बसले आहेत. आता चक्की पिसिंग, पिसिंग नाही तर त्यांच्यासोबतच मिक्सिंग व फिक्सिंग सुरु आहे. भ्रष्ट मंत्र्यांना क्लिन चिट देण्यात ते पटाईत आहेत. आता तर त्यांनी निवडणूक आयोगालाही क्लिन चिट देऊन टाकली, त्यामुळे संशय अधिक बळावला आहे. ‘दाल में कुछ काल नही’ तर सर्व दाळच काळी आहे, असे सपकाळ म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आजपर्यंत ज्या मुद्द्यांची मांडणी केली ते काळाच्या कसोटीवर खरे ठरले आहेत. चीनचा भारताला धोका आहे असा इशारा दिला होता, आता चिनी ड्रॅगन भारताला विळखा घालत आहे. नोटबंदीचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल GDP कमी होईल असे सांगितले, ते खरे ठरले. कोरोना मुळे मोठा धोका असल्याचा इशारा दिला होता पण भाजपा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, त्याचे गंभीर परिणाम भारताला आज भोगावे लागत आहेत.
आताही निवडणूक आयोगाच्या एकूणच प्रक्रियेवर शंका उपस्थित होत आहे. लोकशाही व्यवस्थेचा हा प्रश्न आहे, त्या शंकांचे निरसन करण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे पण आयोग उत्तर देत नाही, सीसीटीव्ही फूटेज देत नाही, उलट नियम बदलून टाकले. निवडणूक आयुक्त नियुक्तीवर फडणवीस बोलले पण काँग्रेसच्या काळातच टी. एन. शेषन आयुक्त झाले त्यांनी आचारसंहिता काय असते ते दाखवून दिले. पण भाजपाच्या मोदी सरकारने तर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती पॅनलमधून सरन्यायाधिश यांना वगळून आपल्याच एका मंत्र्यांची त्या जागी वर्णी लावली हे सांगण्यास फडणवीस विसरले आहेत.
फडणवीस यांचा लेख हा सारवासारव करणारा आहे, कदाचित दिल्लीतील ‘आका’ने सांगितल्याने हा लेखप्रपंच केला असावा. त्यांच्या लेखाला लेखाने उत्तर देण्याची गरज वाटत नाही, त्यावर एखाद्या चारोळीतूनच उत्तर दिले जाऊ शकते, असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे.
राहुल गांधी मीडियाकडे का जातात, या निवडणूक आयोगाच्या प्रश्नालाही सपकाळ यांनी उत्तर दिले आहे. मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, हे आयोगाला मान्य नाही का? आणि काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना वस्तुनिष्ठ उत्तरे आयोगाने द्यावीत असेही सपकाळ यांनी म्हटले आहे. तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व तत्कालीन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करा, महाराष्ट्रातील मतांच्या चोरीचे सत्य उघड होईल अशी मागणीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी केली आहे.
आपण गडचिरोलीला गेले होतो असे फडणवीस सांगत आहेत पण ते गडचिरोलीला का जातात तर तिथल्या खाणीतून मोठा मलिदा मिळतो त्यासाठी ते वारंवार तेथे जातात व त्यासाठीच त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घेतले आहे. आम्ही मात्र गडचिरोलीला जाऊन मतांच्या चोरीविरोधात जनजागृती करणार आहोत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar