Breaking News
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; महागाई भत्ता 53 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता, वैद्यकीय योजनेत होणार महत्त्वाचे बदल
ST Employees: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे. सध्या 46 टक्के दिला जाणारा महागाई भत्ता 53 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय योजनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्याची तयारी प्रशासन करत आहे. यामध्ये ओपीडी खर्चाची भरपाई देण्याचा विचार केला जात असून, कर्मचाऱ्यांना दररोजच्या आरोग्यविषयक गरजांसाठी दिलासा मिळणार आहे.
सह्याद्री अतिथीगृहात महत्वाची बैठक
राज्यातील विविध एसटी कर्मचारी संघटनांच्या मागण्या लक्षात घेता सह्याद्री अतिथीगृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये महागाई भत्ता वाढवण्याबरोबरच, वैद्यकीय योजनेतही बदल करण्याचा निर्णय चर्चेत आला. कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
महागाई भत्ता वाढल्यानंतर घरभाडे भत्त्यातही वाढ शक्य
महागाई भत्ता जर 50 टक्क्यांच्या वर गेला, तर घरभाडे भत्त्यातही वाढ अपेक्षित असते. त्यामुळे या वाढीकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या घरभाडे भत्ता तालुकास्तरावर 8 टक्के असला तरी प्रत्यक्षात 7 टक्केच दिला जातो आणि तोही वेळेवर मिळत नाही, अशी कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.
सध्याची वैद्यकीय योजना आणि बदलाची गरज
सध्याची आरोग्य योजना फक्त ठराविक उपचारांसाठीच लाभ देते. मात्र, नवीन प्रस्तावानुसार मेडिकल कॅशलेस योजनेत ओपीडीचा खर्चही समाविष्ट केला जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.
कर्मचाऱ्यांची कैफियत
2018 पासूनचा थकीत महागाई भत्ता अजूनही मिळालेला नाही.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही भत्ता एकरकमी देण्यात आलेला नाही.
सध्या कर्मचाऱ्यांचा 56 टक्के महागाई भत्ता थकीत आहे.
पगार नियमित सात तारखेला न मिळता, 8, 9 किंवा 10 तारखेला होतो.
एसटीचे रोजचे उत्पन्न सरासरी 22 कोटी, म्हणजे महिन्याला 660-700 कोटी रुपये, तरीही पगारात विलंब.
एसटीमार्फत 36 प्रकारच्या प्रवाशांना तिकीट सवलत, मात्र सरकारकडून भरपाई मिळत नाही.
सरकारकडून सकारात्मक पावलं अपेक्षित
एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढत्या मागण्या आणि संघटनांचा दबाव पाहता, लवकरच महागाई भत्ता वाढ आणि वैद्यकीय योजनेतील सुधारणा यासंबंधी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसाठी हे निर्णय मोठा दिलासा ठरू शकतात.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे