Breaking News
श्री साईबाबा रुग्णालयात अवघड हृदय शस्त्रक्रिया यशस्वी
मुंबई - शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात एक अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून, रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सुखरूप घरी परतला आहे.
नांदेड जिल्ह्यातील चांडोळा गावचे ६५ वर्षीय प्रल्हाद महाजन साखरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांच्या हृदयाच्या वॉलमध्ये छिद्र (Ventricular Septal Rupture) निर्माण झाले होते. या गुंतागुंतीच्या स्थितीत अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये प्रयत्न करूनही, रुग्णाच्या शस्त्रक्रियेतील धोका पाहता डॉक्टरांनी नकार दिला होता.
शेवटचा उपाय म्हणून त्यांनी श्री साईबाबा रुग्णालयात धाव घेतली. येथेही संभाव्य धोका स्पष्ट करून डॉक्टरांनी कुटुंबीयांचा निर्णय मागितला. साईबाबांवरील श्रद्धेने प्रेरित होऊन कुटुंबीयांनी शस्त्रक्रियेस परवानगी दिली.
२४ मे २०२५ रोजी रुग्णाला दाखल करण्यात आले आणि कार्डियाक सर्जन डॉ. श्रेयस पोतदार, भुलतज्ञ डॉ. गायत्रीलक्ष्मी नागपुरे, अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. विजय नरोडे, न्युरोसर्जन डॉ. मुकुंद चौधरी आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. श्री साईबाबा रुग्णालयात ही अशी पहिलीच शस्त्रक्रिया होती.
रुग्ण पूर्णपणे बरा होऊन आज, २ जून २०२५ रोजी डिस्चार्ज झाला. त्यांच्या बंधूंनी, खुशालराव साखरे यांनी डॉक्टरांचे विशेष आभार मानले आणि आनंदाश्रूंनी आपली भावना व्यक्त केली.
या यशस्वी प्रयत्नाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से), उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक आणि उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar