Breaking News
अधिवेशनाच्या शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांनी पुन्हा गाजवला
मुंबई - मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले, आजच्या शेताच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी संविधानावर अभ्यासपूर्ण भाषण करत आजचा दिवस तर गाजवलाच पण सभागृहाची पातळी अत्युच्च उंचीवर नेली.भारताचे संविधान हे जगात सगळ्यात चांगलं संविधान आहे, या संविधानाने सामाजिक, आर्थिक अशी रक्तविहिन क्रांती आणली असं वर्णन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाचे केले, दोन दिवस झालेल्या संविधान सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं सभागृहातील चर्चेत ते सहभागी झाले होते.
ब्रिटिशांचा क्राऊन जाऊन तिथे अशोक चक्र या संविधानामुळे आलं आहे, देशाची सांस्कृतिक एकता ही राजकीय एकतेत परावर्तित करण्याचं काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानाचा मसुदा तयार करताना केलं , शाश्वत भारताचा आत्मा यात पहायला मिळतो असं मुख्यमंत्री म्हणाले. भारतीय संस्कृती आणि भारतीय पारंपरिक न्यान यात पहायला मिळतं असं ते म्हणाले.
भारतातील लोकशाही अधिक प्रगल्भ होती, त्यातील भारतीय शुद्ध तत्त्वातून तयार करण्यात आलेलं हे संविधान आहे हे या संविधानातून बाबासाहेबांनी दाखवले आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भारतीय जीवन पद्धती हा संविधानाचा आत्मा आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भात केलेल्या भाषणात त्यांनी कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षाच्या लोकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला होता असं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्या भाषणाचा काही भाग वाचून दाखवला.
बाबासाहेबांनी पन्नास वर्षांसाठी सामाजिक आरक्षण दिलं मात्र सामाजिक विषमता अद्याप मिटवता आलेली नाही त्यामुळे ती मिटत नाही तोवर हे आरक्षण कायम ठेवावं लागेल.
समान नागरी कायदा आणला पाहिजे याची जबाबदारी बाबासाहेबांनी सगळ्या राज्य सरकारांवर टाकली आहे. गोवंश हत्याबंदीची आवश्यकताही त्यांनीच व्यक्त केली आहे. मूलभूत हक्काचं जतन करण्यासाठी नागरिक थेट उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करू शकतात हा अधिकार याच संविधानाने दिला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
बाबासाहेबांचं संविधान गोठवून आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली, एक लाखाहून अधिक विरोधी पक्षनेते तुरुंगात टाकण्यात आले होते, मिसा कायद्याखाली कोणतेही आरोपपत्र न ठेवता ही कारवाई करण्यात आली होती, त्यामुळे आता संविधान धोक्यात आलं आहे अशी ओरड करणाऱ्यांनी यावरही बोलणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
बाबासाहेबांनी राज्यांना दिलेले बहुतांश अधिकार ४२ व्या घटनादुरुस्तीने केंद्राकडे केंद्रित करण्यात आले, कोणत्याही राज्यात थेट पोलिस उभे करण्याचा अधिकार केंद्राकडे घेण्यात आला यातून संविधानाच्या तरतुदींची नासधूस करण्यात आली असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने या गोष्टी पुन्हा मूळ जागेवर आणल्या त्यामुळे संविधान बदलण्याचा अधिकार आता कोणालाही नाही हे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
काश्मीर बाबतचं ३७० कलम हटवून नरेंद्र मोदींनी बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं असं मुख्यमंत्री म्हणाले. इतिहास विसरतात त्याचं भविष्य कधीच उज्वल नसतं, हे शतक भारताचं आहे, भारताच्या या युगात देशाच्या विकासाचे स्वप्न संविधान आहे, ते दिल्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार व्यक्त करत आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली. शिवसेना उबाठा पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी त्यांच्या भाषणाबद्दल त्यांची स्तुती केली, हे भाषण राजकीय वक्तव्य वगळून अध्यक्षांनी प्रसिद्ध करावे अशी मागणी त्यांनी केली. ती अध्यक्षानी मान्य केली. यानंतर अधिवेशनाचं सूप वाजलं, पुढील अधिवेशन ३० जून पासून घेण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे