धर्मवादी टीका आणि लोकशाही
धर्मवादी टीका आणि लोकशाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांनी यावर टीका केली आहे. तसे टीका करण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला न्यायालयात त्यामुळेच प्रलंबित राहिला आहे का? असा सवाल शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच विरोधकांनी न्यायपालिका आणि कार्यपालिकेमध्ये अंतर असायला हवे, अशी भावना व्यक्त केली. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. यासाठी त्यांनी माजी सरन्यायाधीश के. जी. बाळकृष्णन आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा इफ्तार पार्टीतील फोटो पोस्ट केला आहे. फडणवीस यांनी म्हटले आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का? फडणवीसांनी उठलेला मुद्दा योग्यच आहे. परंतु माजी पंतप्रधान इफ्तार पार्टीचे आयोजन करीत असत, त्यावेळी विरोधकांनी टीका का केली नव्हती, असे फडणवीस यांचे मत दिसते. कुठल्याही गोष्टीत दोन्ही धर्मांत काशी तेढ निर्माण होईल, याची सोय फडणवीस करून नामानिराळे राहतात, असे यातून दिसून येते. असो. हा त्यांच्या राजकारणाचा एक भाग असावा असे वाटते.
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते. देशाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे नुकतीच पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात. पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का? असा सवाल फडणवीस यांनी करून विरोधकांना निरुत्तर केले आहे.
फडणवीसांनी विरोधकांना लक्ष्य करत म्हटलेचाही की, हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत विरोधकांची का मजल जावी? प्रश्न गहन आहे. हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा, गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा अपमान नाही का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच १८ सप्टेंबर २००९ साली माजी सरन्यायाधीश केजी बाळकृष्णन यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी आयोजित इफ्तार पार्टीला उपस्थित राहिल्याचे फोटोही पोस्टसह अपलोड करायला फडणवीस विसरले नाहीत.
शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनीही संजय राऊत यांच्या भूमिकेवर टीका केली. मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे की , गणेश चतुर्थीनिमित्त राजकीय विरोधकही एकमेकांच्या घरी दर्शन घेण्यासाठी जात असतात. मी २० वर्षांपासून हे करत आलो आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरन्यायाधीश यांच्या घरी जाण्यावरून जी टीका होतेय, त्याचा स्तर खालावलेला आहे. सत्ताधारी ज्याप्रमाणे विरोधकांवर टीका करतात. तसे सत्ताधारी पक्षांचे नेतेही एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून विरोधकांवर टीका करतात असे दिसते.
मिलिंद देवरा यांनीही २००९ साली माजी सरन्यायाधीश के. जी. बाळकृष्ण यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला हजेरी लावल्याचा मुद्दा उपस्थित केला. देवरा म्हणाले की, आता २००९ च्या घटनेवरही तुम्ही टीका करणार का? विरोधक खूपच अपरिपक्व अशी टीका करत आहेत. आरोप करण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेतली पाहीजे. खरा प्रश्न असा आहे की, इफ्तार पार्टी वा गणेशोत्सव समारंभ असो, दोन्हीही देशातील भिन्न धर्माचे सण आहेत. त्यात कुणी सामील व्हायचे आणि कुणी नाही हे कोणी ठरवू शकत नाही. सध्या धर्मवाद एवढा टोकाचा झाला आहे की, काही नेते त्यात धर्म, जाती शोधत असतात. टीका ही योग्य असावी, ज्याच्यावर टीका झाली आहे, ती खिलाडूपणे मान्य केली पाहिजे. परंतु देश दोन धर्मात वैचारिकरित्या वेगळा करण्याचे कारस्थान नेमके कोण करीत आहे? याचा शोध घेणे महत्वाचे आहे. मुस्लिम नेहमीच वाईट आणि हिंदू नेहमीच योग्य अशी विचारसरणी ठेवणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे. सत्ताधार्यांना जो अपेक्षित कट्टर धर्मवाद आहे, त्याला विरोधी पक्षाने खतपाणी घालण्याची गरज नसावी असे वाटते. राजकारणात ढवळ्यासंगे पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला असे होईल तर लोकशाहीची लक्तरे निघतील. सणाचे निमित्त साधून धार्मिक टीकेची पोळी भाजणाऱ्या दीड शहाण्यांकडून हे समजून घेणे महत्वाचे आहे. अन्यथा टीका - प्रतिटीकेत धर्म ,जाती द्वेष आला की कट्टर धर्मवाद्यांचीच री ओढण्याचे पातक होईल आणि हेच लोकशाहीत घातक आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya