२४ फेब्रुवारीला नवी दिल्लीत राज्य निवडणूक आयुक्तांची ‘राष्ट्रीय परिषद’
२४ फेब्रुवारीला नवी दिल्लीत राज्य निवडणूक आयुक्तांची ‘राष्ट्रीय परिषद’
मुंबई - : भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) वतीने राज्य निवडणूक आयुक्तांची (State Election Commissioners – SECs) राष्ट्रीय परिषद २४ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आली आहे. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील राज्य निवडणूक आयुक्त या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, ही राष्ट्रीय परिषद २५ वर्षांहून अधिक कालावधीनंतर होत असून, यापूर्वी अशी परिषद १९९९ साली आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेचे अध्यक्षस्थान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार भूषवणार असून, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
परिषदेत राज्य निवडणूक आयुक्तांसह त्यांचे कायदेशीर व तांत्रिक तज्ज्ञ सहभागी होणार असून, निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध विषयांवर आपले विचार मांडणार आहेत. याशिवाय भारत निवडणूक आयोगाचे सर्व ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) देखील या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेचा मुख्य उद्देश भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगांमध्ये त्यांच्या-त्यांच्या कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रिया व व्यवस्थापनाबाबत समन्वय (synergy) अधिक मजबूत करणे हा आहे.
परिषदेदरम्यान राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मतदार पात्रतेसंबंधी निवडणूक कायदे, भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ECINET या डिजिटल प्लॅटफॉर्मसह तांत्रिक नवकल्पना, तसेच ईव्हीएम (EVM) यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.
भारत निवडणूक आयोग संविधान व देशातील कायदेशीर तरतुदींनुसार मतदार यादी तयार करणे व निवडणुका पार पाडण्याचा आपला व्यापक अनुभव या परिषदेत राज्य निवडणूक आयोगांशी सामायिक करणार आहे.
राज्य निवडणूक आयोगांची स्थापना ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्ती तरतुदींनुसार संबंधित राज्यांच्या कायद्यांद्वारे करण्यात आली असून, पंचायत व नगरपालिका संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करणे तसेच निवडणुकांचे संचालन, दिशा व नियंत्रण ही जबाबदारी राज्य निवडणूक आयोगांवर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर