Breaking News
वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा
वृद्धांसाठी सरकारचा निर्णय, मुख्यमंत्री शिंदेंकडून तीर्थदर्शन योजनेची घोषणा
मुंबई : राज्यात काही आमदार, खासदार असे आहेत, जे त्यांच्या विभागातील नागरिकांसाठी कमी पैशात किंवा मोफत देवदर्शन यात्रा आयोजित करत असतात. आजवर आमदार राम कदम यांनी अनेकदा तीर्थक्षेत्र दर्शन आयोजित करून लोकांना मोफत देवदर्शन घडवून आणले. याचबाबतचा मुद्दा शनिवारी (ता. 29 जून) आमदार प्रताप सरनाईक विधानसभेत लक्ष्यवेधीच्या माध्यमातून यांनी उपस्थित केला. त्यांच्या या लक्ष्यवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृद्धांसाठी एका योजनेची घोषणा केली आहे.
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत लक्ष्यवेधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना लागू करण्याची मागणी केली होती. ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनाला जाण्याची इच्छा असते, पण आर्थिक स्थिती नसल्याने ते जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ही योजना लागू केल्यास ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन करता येईल, अशी मागणी या लक्ष्यवेधीतून प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना लागू केली आहे.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करण्यात येईल. मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरू करत असताना नियमावली ठरवू, खर्च आणि इतर बाबी पाहू. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवू. जे लोक इच्छा असून दर्शनापासून वंचित राहतात त्यांना देवदर्शन घडेल त्यासाठी हा निर्णय घेत आहे. ही योजना सर्व धर्मीयांसाठी असेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात देण्यात आली आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. 28 जून) अर्थसंकल्पातून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. लाडकी बहीण ही योजना लागू करत सरकारने महिलांसाठी मोठा निर्णय घेतला. शेतकरी, वारकरी आणि तरुणांसाठीही सरकारने योजना लागू केल्या आहेत. तसेच महिलांसाठीही विविध योजना जाहीर केल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने या घोषणा केलेल्या असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करत वृद्धांना राज्य सरकारच देवदर्शन घडवणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant