Breaking News
नवी मुंबई : तळोजा एमआयडीसीतील मोदी केमिकल या कंपनीत शुक्रवारी मध्यरात्री आग लागून झालेल्या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आणखी काही जवानाना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तळोजा एमआयडीसीतील भूखंड क्रमांक जे 39 वर असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणार्या कंपनीमध्ये रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच तळोजा एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. मात्र आगीची व्याप्ती मोठी असल्याने सिडको, अंबरनाथ येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना, जळणार्या केमिकलच्या विषारी धुराची काही जवानांना बाधा झाली. यात अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकातील बाळू देशमुख (32) या जवानाचा श्वास गुदमरला. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. इतर काही जवानांना देखील स्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना देखील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
देशमुख यांना बाधा झाल्यानंतर तत्काळ रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. परंतु त्यांना अग्निशमन गाडीतच विश्रांतीसाठी झोपविण्यात आले. बेशुद्ध अवस्थेत उलटी झाल्यावरही वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बचावकार्यावेळी अंबरनाथ अग्निशमन केंद्राचे निर्णयक्षम अधिकारी तेथे असणे आवश्यक होते. मात्र ते घटनास्थळी नसल्याने देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय होऊ शकला नाही. परिणामी त्यांच्या मृत्यूला संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप भाऊ उत्तम देशमुख यांनी केला आहे. तसेच देशमुख यांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्याने त्यांना शहिदाचा मान मिळणे आवश्यक आहे. परंतु एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांच्या अंत्यविधीकडे पाठ फिरवली. अंबरनाथ अग्निशमन केंद्रातील अधिकारी व कर्मचार्यांच्या उपस्थितीत केवळ सलामी देण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya