Breaking News
जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने तंबाखू मुक्तीची शपथ
मुंबई - जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृहामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (वित्त) श्री. प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनाचे दिनांक ३० मे २०२५ रोजी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखूचे सेवन न करण्याची तसेच व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख कामगार अधिकारी श्री. सुनील जांगळे यांच्यासह नशाबंदी मंडळाचे चिटणीस श्री. अमोल स. भा. मडामे, नशाबंदीमंडळ कार्यक्रम समन्वयक श्री. मिलिंद पाटील, श्री. संदीप नेमलेकर, ‘सलाम मुंबई फाउंडेशन’चे समन्वयक श्री. संजय ठांगणे, श्री. विशाल जाधव यांच्यासह बृहमुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
भारतात १३ ते १५ वयोगटातील ८.५ टक्के कुमारवयीन मुले तंबाखूच्या अधीन गेली आहेत. भारतात दरदिवशी ५ हजार ५०० नवीन युवक तंबाखूच्या चक्रव्यूहात अडकतात. तसेच दरदिवशी ३ हजार ५०० लोकांचा तंबाखूच्या व्यसनामुळे मृत्यू होतो. गंभीर बाब म्हणजे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे भारतात दरवर्षी १३ लाख लोक मृत्यूमुखी पडत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालातून पुढे आले आहे. यासंदर्भात समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने आज (दिनांक ३० मे २०२५) ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’च्या औचित्याने बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, कामगार विभाग आणि महाराष्ट्र राज्याचे नशाबंदी मंडळ आणि ‘सलाम मुंबई फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील उपहारगृहामध्ये पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या कर्मचाऱयांसाठी विविध आरोग्य व वैद्यकीय सेवा-सुविधा देखील पुरवित असते. मुंबई तंबाखूमुक्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य समिती यांच्याद्वारे दिनांक ३१ मे २०२५ पासून मुंबईत मोठ्या प्रमाणात तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.
पोस्टर प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर उप आयुक्त (वित्त) श्री. प्रशांत गायकवाड यांच्या उपस्थितीत महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱयांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमादरम्यान, कर्मचारी वर्गाला तंबाखूचे दुष्परिणाम सांगणारी पत्रके देखील वाटण्यात आली. तंबाखू व इतर व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती अधिकाधिक प्रभावीपणे देण्यासह नागरिकांना व्यसनांपासून परावृत्त करण्याच्या आणि “तंबाखूजन्य पदार्थ व विक्री कायदा २००३” च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले आहे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant