Breaking News
निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू – वर्षाराणी मुस्कावाड
पुणे - निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू आहे. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी काव्य लेखन हे उत्तम माध्यम आहे. देशाच्या स्वातंत्र्यात कविता आणि साहित्यातील विविध प्रकारांचे अमूल्य योगदान आहे. समाजभान असणाऱ्या कवींना व सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे काम पिंपरीतील आर्य समाज संस्था सलग पंचवीस वर्ष करत आहे हे अभिमानास्पद आहे असे नांदेड येथील ज्येष्ठ लेखिका वर्षाराणी मुस्कावाड यांनी सांगितले.
आर्य समाज पिंपरी या संस्थेच्या वतीने रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय श्रावणधारा कविसंमेलन आणि राज्यस्तरीय समाजभूषण व कार्यगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पिंपरी येथील आर्य समाज ग्रंथालय यांच्या वतीने सत्संग भवन येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष वर्षाराणी मुस्कावाड बोलत होत्या. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शितल मालुसरे, उद्योजक श्रीहरी कुलकर्णी, आर्य समाज पिंपरीचे प्रमुख मुरलीधर सुन्दराणी, अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, सचिव दिनेश यादव तसेच उत्तम दंडीमे व हास्य कलाकार आर. के. चोपडा व कवी आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दत्ता सूर्यवंशी (क्रीडा), शुभांगी शिंदे (साहित्य), सुधीर फेंगसे (कामगार), नवनाथ मोरे (सामाजिक), मारुती बाणेवार (पत्रकारिता), सीमा गांधी (पर्यावरण), रवींद्र कुरवडे (औद्योगिक) वैजू चांदवले (कला) यांना राज्यस्तरीय समाजभूषण व कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन राजेंद्र सगर, प्रस्तावना उत्तम दंडीमे आणि आभार नलिनी देशपांडे यांनी मानले.
उपस्थित कवींनी श्रावण धारा, देशभक्ती, मानवी जीवन, आधुनिक शिक्षण व राष्ट्रवाद, शेतकरी समस्या, भ्रष्टाचार, पर्यावरण, गोरक्षण व भारतीय संस्कृती अशा विविध व सामाजिक विषयांवर सामाजिक प्रबोधन करणाऱ्या कविता सादर केल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar