Breaking News
मुंबई : महाराष्ट्र शासनाचा सहकार भुषण व सहकार महर्षी पुरस्कार प्राप्त संस्था ज्ञानदीप को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई या प्रथम क्रमांकाच्या संस्थेची ४६ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष जिजाबा पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दिनांक १४ सप्टेंबर, २०२५ रोजी "मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्र, वासुदेव बळवंत फडके मार्ग (९० फुट रस्ता), मुलुंड (पूर्व), मुंबई" येथे उत्साही वातावरणात पार पडली.
सभेत मुंबै बँकेचे अध्यक्ष व गटनेते विधानपरिषद आमदार प्रविणभाऊ दरेकर उपस्थित होते. सभेची सुरुवात विठठल अडुळकर, उमा साखरे, सुनिल राउत, नंदकुमार महाडेश्वर आणि रतनसिंह शिंदे यांच्या शुभहस्ते गणेशपूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
आमदार दरेकर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष जिजाबा पवार यांनी शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. याशिवाय संस्थेने सुरू केलेल्या फ्रँकिंग मशिनचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. त्यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सहकारी संस्था चालवणे कठिण असते, तरी ज्ञानदीप संस्थेने ६,५०० कोटींपेक्षा जास्त संमिश्र व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. ग्रामीण भागात सहकार चळवळीला अधिक वैभव मिळावे, असे त्यांनी अधोरेखित केले.
संस्थेचे संस्थापक संचालक विश्वनाथ पवार यांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल तसेच अध्यक्ष जिजाबा पवार यांची महाराष्ट्र शासनाचे नियामक मंडळ व पगारदार सहकारी पतसंस्था आदर्श उपविधी दुरुस्ती समितीमध्ये सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रविणभाऊ दरेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
मागील सभेचे इतिवृत्त संचालक बाळकृष्ण पवार यांनी वाचले. आर्थिक वर्षात केलेल्या कार्याचा अहवाल उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ यांनी सादर करताना दिनांक ३१ मार्च २०२५ अखेर संस्थेचे एकूण सभासद ३,०५,६८२, वसुल भाग भांडवल रु. १५४ कोटी, राखीव व इतर निधी रु. ५२८ कोटी, थकबाकीचे प्रमाण ३.६३% आणि निव्वळ एन.पी.ए. ०% असल्याचे सांगितले. मार्च २५ अखेर एन.पी.ए. रु. १८१ कोटी होती. संस्थेचा स्वनिधी रु. ६३८ कोटी, ठेवी रु. ३,६७० कोटी, कर्जे रु. २,८८८ कोटी, संमिश्र व्यवसाय रु. ६,५५८ कोटी, गुंतवणूक रु. १,३२१ कोटी असून निव्वळ नफा रु. ४५.३९ कोटी झाला.
सचिव चंद्रकांत शिंदे, संचालक एकनाथ जगताप, रविंद्र केंजळे, विजय कासुर्डे, निवृत्ती मस्के, अनुप पवार, बाळासाहेब वांजळे, शुभम पवार आणि किरण तपकिरे यांनी विषय सुचीनुसार ठराव मांडले व सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. संचालक हणमंत धिवार, संचालिका छाया शिंदे व दुर्गा वाघ तसेच कर्मचारी प्रतिनिधी संजय शिर्के उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक, संचालक विश्वनाथ पवार यांनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सुधारीत आदर्श उपविधी स्वीकृतीबाबत वाचन केले. अधिकाधिक सभासद उपस्थित राहून प्रश्न विचारावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
अध्यक्ष जिजाबा पवार यांनी शाखेच्या व्यवसाय वृद्धीवर आधारित जागा खरेदी व विक्री, सामाजिक कार्य, ठेवी व कर्ज व्याजदरात बदल, निधी उभारणी व विनियोग धोरण तसेच मुलुंड येथील विग्नहर पतसंस्था विलीनकरण प्रस्ताव सादर करून सभागृहाची मान्यता घेतली. ज्ञानदीप ही फ्रँकिंग मशीनची सुविधा उपलब्ध करून देणारी एकमेव संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक डिजीटल व्यवहारांच्या सेवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. वार्षिक सभेने मंजूरी दिलेल्या ११% लाभांशाचे वितरण सभेनंतर करण्यात आले.
सभेचे सूत्र संचालन संचालक रविंद्र केंजळे यांनी केले, संचालिका दुर्गा वाघ यांनी आभार मानले. मुख्यव्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण, विभागीय व्यवस्थापक व इतर कर्मचारी यांनी सभेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. पसायदानानंतर मा. अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant