Breaking News
अनुपम खेर सुरु करणार सतीश कौशिक यांच्या नावाने शिष्यवृत्ती
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या दिवंगत मित्र सतीश कौशिक यांच्या स्मरणार्थ एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारकडून “राज कपूर जीवनगौरव पुरस्कार” अंतर्गत मिळालेल्या १० लाख रुपयांचा उपयोग करून, अनुपम खेर यांनी अभिनय क्षेत्रातील गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांसाठी “सतीश कौशिक शिष्यवृत्ती” सुरू करण्याची घोषणा केली आहे.
ही शिष्यवृत्ती त्यांच्या अभिनय संस्थेत “Actor Prepares” मध्ये तीन महिन्यांचा डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. विशेषतः गरीब कुटुंबातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर करत या निर्णयाची माहिती दिली, ज्यात त्यांनी पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि धनादेश दाखवला. त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले की, “हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्यानंतर मला खूप अभिमान वाटला आणि मी ठरवलं की या निधीतून सतीश कौशिक यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू करावी.”
याशिवाय, अनुपम खेर यांनी त्यांच्या अभिनय संस्थेतील एका स्टुडिओमध्ये सतीश कौशिक यांचा पुतळा बसवण्याचीही घोषणा केली आहे, जेणेकरून त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी जिवंत राहतील. सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांची मैत्री सिनेविश्वात प्रसिद्ध होती, आणि या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनुपम खेर यांनी आपल्या मित्राच्या आठवणींना एक सुंदर आणि अर्थपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant