Breaking News
खा. संजय दिना पाटील यांच्या प्रश्नाची शासनाने घेतली दखल!
विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे वजन तपासणार – शिक्षण मंडळ
मुंबई – विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात खासदार संजय दिना पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याची दखल शिक्षण विभागाने घेतली असून त्यादृष्टीने कारवाई करण्यात येईल. त्याबाबतच्या सुचना शिक्षणाधिका-यांना देण्यात आल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे कमी होण्याऐवजी वाढत असून त्यामुळे त्यांना पाठिचा त्रास होत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. राज्य शासनाने दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी एकाच पुस्तकात तीन विषय घेऊन ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र राज्यातील अनेक शाळा कमिशनसाठी खासगी प्रकाशनाची पुस्तके घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप पालिकांनी केला आहे. त्यामुळे मुलांच्या दफ्तरांचे ओझे वाढले असून व्यवसायिक आणि शिक्षणविरोधी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर याची दखल शिक्षण विभागाने घेतली असून दफ्तराच्या वजनासंदर्भात तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी शिक्षणाधिका-यांना केल्या आहेत. अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे वजन कमी असण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. दुसरी ते चौथीत शिकणा-या विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे वजन पाच ते सहा किलो इतके असते. विविध विषयांचे पुस्तके, वह्या, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, कंपास पेटी व इतर साहित्यांमुळे दफ्तरांचे ओझे वाढत आहे. शाळेच्या वेळापत्रकात एकच विषय वाढविणे तसेच कला, खेळ यांचाही समावेश केल्यास दफ्तरांचे ओझे कमी होण्यास मदत होईल अशा सुचनाही खासदार संजय दिना पाटील यांनी केल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर