Breaking News
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला २० गावातील गावकऱ्यांचा विरोध
कोल्हापूर : कोल्हापूर नगरपालिकेचे रूपांतर कोल्हापूर महानगरपालिकेत १९७२ मध्ये झाले. मात्र, त्यानंतर अद्याप एकदा देखील कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही. यामुळं शहराचा विकास खुंटल्याचं म्हटलं जातंय. अशातच आता शहराची हद्दवाढ व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणात शहरातून मागणी होत असून सरकार देखील हद्द वाढीसाठी सकारात्मक असल्याचं दिसून येतंय. आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापूरच्या हद्दवाढ संदर्भात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलीय. मात्र, दुसरीकडं हद्दवाढीमध्ये येणाऱ्या २० गावांनी आज गाव बंदची हाक दिलीय.
हद्दवाढीला २० गावांचा विरोध : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून हद्दवाढ समर्थक कृती समिती आणि हद्दवाढ विरोधी समितीमध्ये संघर्ष सुरू आहे. कोल्हापूर महानगर पालिका १९७२ ला स्थापन झाल्यापासून ६६.८२ चौ.कि.मी. इतकीच हद्द आहे. गेल्या कित्येक वर्षात या महानगरपालिकेची हद्दवाढच झालेली नाही. ज्यामुळं शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत. महापालिकेनं हद्दवाढीसाठी ६ वेळा प्रस्ताव शासनाला पाठवला अनेक आंदोलन, उपोषण झाले तरीही अद्याप प्रस्ताव मंजूर झाला नाही. दरम्यान, आज दुपारी उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात हद्दवाढ संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मात्र या बैठकीला आणि हद्दवाढीला शहरालगतच्या २० गावांनी विरोध केलाय.
हद्दवाढीला गावकऱ्यांचा विरोध!
...तर तीव्र आंदोलन होईल : या २० गावांनी आज गाव बंद ठेवत हद्दवाढीला विरोध दर्शवला असून कोल्हापुरातील उचगाव, पाचगाव, कळंबा, वडणगे यासह प्रत्येक गावात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका शहराचा विकासच करण्यात अपयशी ठरलेली असताना या गावांना शहरात घेऊन आमच्या गावांचा देखील विकास खुंटणार, यापेक्षा प्राधिकरणाला आणखी ताकद मिळाली तर आमच्या गावाचा आणखी विकास होईल. तसंच, जर हद्दवाढ झाली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण आणि ग्रामस्थांनी दिलाय. यामुळं आता मुंबईत पार पडणाऱ्या आजच्या बैठकीत नेमकं काय निर्णय होणार, याकडं जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant