Breaking News
मराठवाड्यात होणार पहिला Agro Logistic Park
वैजापूर,दि. १२ : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता जागतिक बाजारपेठांमध्ये थेट पोहोचता येणार आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘अॅग्रो लॉजिस्टिक पार्क’ योजनेतून पहिला प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगाव येथे उभारण्यात आला आहे. सुमारे 30 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा अत्याधुनिक लॉजिस्टिक पार्क, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या साठवणुकीपासून ते प्रतवारी, पॅकिंग आणि वाहतुकीपर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली देणारा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. जांबरगाव लॉजिस्टिक पार्कचे काम जवळपास पूर्ण झाले असून, केवळ विद्युत जोडणीची प्रक्रिया शिल्लक आहे. काही आठवड्यांतच हा प्रकल्प औपचारिकपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. यानंतर मराठवाडा आणि आसपासच्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी अधिक चांगल्या बाजारपेठा, सुविधा आणि दारे खुली होतील. हा प्रकल्प राज्यातील शेती क्षेत्रात आधुनिकतेची नवी दिशा दाखवणारा ठरेल, असा विश्वास शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
वैशिष्ट्ये
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे 25 एकर क्षेत्रात हा प्रकल्प साकारला आहे.
यात 10,000 मेट्रिक टन क्षमतेचे सायलो, 10,000 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम, स्वतंत्र ग्रेडिंग आणि स्वच्छता यार्ड, मोठ्या वाहनांसाठी ट्रक टर्मिनल आणि पेट्रोल पंप, तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी सामाजिक सुविधा केंद्र यांचा समावेश आहे.
या सर्व सुविधा शेतमाल साठवणूक आणि वितरण प्रक्रियेत क्रांतिकारी बदल घडवून आणतील.
या पार्कचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे समृद्धी महामार्गालगतचे स्थान. या महामार्गाच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापारी आपला माल थेट मुंबईतील जेएनपीटी बंदरात पोहोचवू शकतील, जेथे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी मालाची निर्यात सुलभ होईल. यामुळे शेतमालाला चांगला दर मिळण्यास मदत होईलच, शिवाय स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल.
राज्य सरकारने समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना एकूण चार अॅग्रो लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे नियोजन केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant