Breaking News
ATM ऑपरेटरने केला 1.90 कोटींचा घोटाळा
नवी मुंबईत कुंपणानेच शेत खाल्ल्यासारखी गंभीर घटना घडली आहे. तब्बल 1 कोटी 90 लाख 49 हजार 600 रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी असलेल्या एका 27 वर्षांच्या ऑपरेटरनेच हा घोटाळा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंबोली पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 316 (4) नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातील रोख रक्कम हाताळणाऱ्या खासगी कंपन्यांच्या सुरक्षितता आणि अंतर्गत नियंत्रण यंत्रणेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. विशेषतः एटीएममध्ये नियमितपणे रक्कम भरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य पद्धतीने देखरेख केली जात आहे का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कळंबोली पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून गुन्ह्यातील संपूर्ण रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवी मुंबई कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोठे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले, “रोख रक्कम व्यवस्थापन करणाऱ्या एका खासगी कंपनीने तक्रार दाखल केल्यानंतर गुरुवारी एफआयआर नोंदवण्यात आला. आरोपी धनराज भोईर (वय 27), रहिवासी पनवेल, हा संबंधित कंपनीत एटीएम ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.”
तपासात उघड झाल्यानुसार, फेब्रुवारी 2025 ते जून 2025 या पाच महिन्यांच्या कालावधीत आरोपी धनराज भोईर याच्यावर कामोठे, कळंबोली आणि खारघर परिसरातील 16 एटीएम मशीनमध्ये रोख रक्कम भरण्याची जबाबदारी होती. मात्र, त्याने एटीएममध्ये पैसे भरल्याचा बनावट दाखला तयार करून कंपनीकडून घेतलेली सर्व रक्कम स्वतःच्या वापरासाठी वापरली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे