Breaking News
थरारक! तेलंगणात महिलेने रेल्वे ट्रॅकवर चालवली कार
तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात, एका ३४ वर्षीय महिलेने तिची गाडी रेल्वे रुळावर आणली. यामुळे तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. १०-१५ गाड्या थांबवाव्या लागल्या किंवा वळवाव्या लागल्या. शंकरपल्लीजवळ घडलेल्या या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. १३ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये महिला रेल्वे ट्रॅकवर किआ सोनेट कार चालवत असल्याचे दिसून येते. महिलेने रेल्वे ट्रॅकवरून सुमारे ८ किमी गाडी चालवली, ज्यामुळे अनेक रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्थानिक लोक, रेल्वे कर्मचारी आणि पोलिस महिलेला गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. जमावाने तिला गाडीतून बाहेर काढल्यानंतर तिचे हात बांधले आहेत. महिलेने असे का केले आणि तिची मानसिक स्थिती काय होती, याचा तपास सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रेल्वेचे अनेक कर्मचारी आणि पोलिस गाडीच्या मागे धावले. मोठ्या कष्टाने त्यांना गाडी थांबवण्यात यश आले. महिलेला गाडीतून बाहेर काढण्यासाठी सुमारे २० जणांची मदत घ्यावी लागली. ती अजिबात सहकार्य करत नव्हती. रेल्वे पोलिस अधीक्षक चंदना दीप्ती म्हणाल्या की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, ही महिला अलिकडेपर्यंत एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होती. ती उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. ती खूप आक्रमकपणे वागत होती. असे दिसून आले की ती मानसिकदृष्ट्या अस्थिर होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे