Breaking News
पंढरपूरात चंद्रभागा नदीला पुराचा धोका
पंढरपूर - यावर्षी पहिल्यांदाच जून महिन्यात उजनी धरण भरले आहे. यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. मात्र आता अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्यामुळे लवकरच येऊ घातलेल्या आषाढीला पंढरपूरात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. उजनी धरणाचा पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचल्याने भीमा नदीत ३६ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वीर धरणातूनही नीरा नदीमार्गे भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. सध्या उजनी धरणातील साठा ७७ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांवर आला आहे. पाणी नियोजनासाठी उजनी धरण व्यवस्थापन समिती आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी १० हजार ते ३६ हजार क्युसेक्स दरम्यान नियोजित पाणी विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
नीरा खोऱ्यातही पावसाचा जोर कायम आहे. वीर धरणातून नीरा नदीत ६,५३७ क्युसेक्सने सुरू असलेला विसर्ग आज सकाळपासून १५ हजार क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आला आहे. हे पाणी अकलूज येथील नीरा–भीमा संगमातून पुढे चंद्रभागा नदीला मिळत आहे. चंद्रभागेतील पाण्याची पातळी सध्या ४० हजार क्युसेक्सच्या पुढे गेली आहे. यामुळे चंद्रभागा वाळवंटातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे भाविकांनी स्नान करताना वाहत्या पाण्याचा अंदाज घेऊन काळजी घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर