Breaking News
सांगलीच्या जयश्री पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपा प्रवेश
मुंबई - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला. या वेळी आ.सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, ज्येष्ठ नेते शेखर इनामदार, सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदी उपस्थित होते. श्रीमती पाटील ह्या माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून आहेत.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. वसंतदादा पाटील यांच्या लोकहिताच्या अनेक निर्णयांचे स्मरण केले. वसंतदादांच्या समाजकार्याचा वारसा जयश्रीताई पुढे चालवत आहेत. काँग्रेसने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही मात्र भाजपा परिवारामध्ये त्यांची आणि कार्यकर्त्यांची आपुलकीने काळजी घेतली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सांगली जिल्ह्यात भाजपाची ताकद जयश्रीताई यांच्या प्रवेशामुळे वाढणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, वसंतदादा घराण्यातील व्यक्ती भाजपामध्ये प्रवेश करत आहे याला मोठे महत्व आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता या सर्वांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.
यावेळी जयश्री पाटील यांनी आपल्या पक्ष प्रवेशावेळी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याच्या, सांगलीच्या विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश करत आहोत असे त्यांनी सांगितले. काँग्रेसने अन्याय केल्याने विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी केली होती. मात्र भाजपामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागणूक मिळेल याची खात्री आहे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी माजी महापौर किशोर शहा, कांचनताई कांबळे, प्रशांत पाटील, उत्तम साखळकर, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, शेवंताताई वाघमारे, माजी नगरसेवक अजित सूर्यवंशी, रोहिणी पाटील, मृणाल पाटील, करण जामदार, प्रकाश मुळके, अजित दोरकर, तानाजी पाटील, सुभाष यादव, आनंदराव पाटील, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुनील जाधव पाटील आदींनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
दिशाहीन नेतृत्वाला कंटाळून काँग्रेस नेते पक्ष सोडत आहेत – मुख्यमंत्री फडणवीस
भाजपाने विरोधी पक्षात असतानाही कधीही देशहित आणि समाजहिताचा विचार सोडला नाही. मात्र विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचे नेतृत्व हे दिशाहीन आहे, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळत केली. सातत्याने भारतीय सेनेच्या विरोधात काँग्रेस नेतृत्व बोलत असल्याने काँग्रेसमधील निष्ठावंतांमध्ये निराशा आहे. नेत्यांचे खच्चीकरण होत असल्याने आज अनेक काँग्रेस नेते पक्ष सोडून भाजपामध्ये येण्यास उत्सूक आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade