Breaking News
अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाचा जाब –
मुंबई - ७ जूनपासून सुरू झालेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी, वेळापत्रकातील अनिश्चितता आणि प्रशासकीय हलगर्जीपणामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थी आणि पालक संभ्रमात सापडले आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज उपसंचालक आणि सहाय्यक संचालक (शालेय शिक्षण), मुंबई विभाग यांच्या कार्यालयात धडक देत तीव्र शब्दांत जाब विचारला.
शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले असून, प्रवेश प्रक्रियेला लागलेल्या तांत्रिक अडथळ्यांविषयी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाची ही निष्क्रियता आणि उदासीनता ही विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत केलेली अक्षम्य थट्टा आहे, असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.
आम्ही ही विनंती नाही करत – हा संतप्त, जागरूक नागरिकांचा इशारा आहे! वेबसाईट वारंवार डाऊन जाणे, अर्ज सादर करताना अडचणी, वेळापत्रकात सतत बदल, तसेच कोणतीही अधिकृत मार्गदर्शन यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया गोंधळाची आणि त्रासदायक झाली आहे. हे डिजिटल शिक्षणाचे अपयश नव्हे तर शिक्षण विभागाच्या ढिसाळतेचे फलित आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठोस मागण्या
अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात यावी. ‘लाडके विद्यार्थी योजना’ तात्काळ लागू करण्यात यावी.स्वतंत्र, जबाबदार तांत्रिक पथकाची नेमणूक करावी. तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे निर्माण झालेल्या गोंधळासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
विद्यार्थी व पालक प्रतिनिधींसोबत उघड संवाद साधून पुढील सुधारणा राबवाव्यात.
हा विषय केवळ एक प्रवेश प्रक्रियेचा नसून विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आयुष्याशी जोडलेला आहे. जर शासनाने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक मार्ग अवलंबण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी ॲड. अमोल मातेले यांनी दिला.यांच्या समवेत ओमकार रामकृष्ण शिर्के मुंबई उपाध्यक्ष ,मयूर केणी उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष , संतोष पवार दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष, इमरान तडवी मुंबई सरचिटणीस ,नवनाथ सपकाळ उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष,सुदर्शन खंडागळे वरळी तालुका अध्यक्ष ,रोहित सावंत मुंबई सरचिटणीस,इस्लाम शेख कुलाबा तालुका अध्यक्ष ,आझाद पठाण उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष ,नसीम खान उत्तर मुंबई जिल्हा सचिव उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade