Breaking News
अहमदाबाद विमान अपघातात पंढरपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू
अहमदाबाद - अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या विमान अपघातात पंढरपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू झाला. ते मुलाला भेटण्यासाठी लंडनला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. तर दुसरीकडे एअर इंडियामध्ये केबीन क्रू म्हणून नोकरी करत असलेल्या एका तरुणाचा संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादमध्ये आज झालेल्या भीषण विमान अपघातात सांगोला तालुक्यातील हातीद गावाचे मूळ रहिवासी असलेले महादेव तुकाराम पवार (६७) आणि त्यांच्या पत्नी आशा महादेव पवार (५५) या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लंडनला मुलाला भेटण्यासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. पवार कुटुंब हे सध्या अहमदाबादमध्ये स्थायिक झाले होते. कारण त्यांचा एक मुलगा अहमदाबादमध्ये राहतो. तर दुसरा मुलगा लंडनमध्ये बेकरीचा व्यवसाय करतो. अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानात बदलापूरच्या दीपक पाठक यांचाही समावेश आहे. दीपक पाठक हे गेल्या ११ वर्षांपासून एअर इंडियामध्ये केबीन क्रू म्हणून नोकरी करत होते. दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.
दीपक पाठक यांचं कुटुंब बदलापूरच्या कात्रप भागातील रावल कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्याला आहे. दीपक यांनी आज सकाळीच लंडनला निघण्यापूर्वी आईला फोन केला होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant