Breaking News
आरसीबी विरुद्ध पंजाब सामन्यावर पावसाचं संकट? कसं असेल आज अहमदाबादचं हवामान
RCB vs PBKS IPL 2025 Final, Narendra Modi Stadium, Pitch And Weather Report Today: आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आमनेसामने येणार आहेत. आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामना मंगळवारी (3 जून) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पंजाब आणि आरसीबी आता इतिहास रचण्यापासून फक्त एक विजय दूर आहेत. दोन्ही संघ त्यांचे पहिले आयपीएल जेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहेत.
दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाप किंग्ज या हंगामातील दोन सर्वोत्तम संघ आहेत. लीग टप्प्यात पॉइंट पंजाब टेबलमध्ये अव्वल स्थानावर होते तर आरसीबी दुसऱ्या स्थानावर होते. 14 सामन्यांनंतर दोन्ही संघांचे 19 गुण होते. परंतु पंजाब फक्त नेट रन-रेटमुळे पुढे होते. अशा परिस्थितीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
फायनलमध्येही पावसाचा व्यत्यय
आयपीएल 2025 चा अंतिम सामना कोलकाता येथे होणार होता. परंतु, पावसाळ्यात शहरात सहसा मुसळधार पाऊस पडतो म्हणून हवामानाच्या कारणास्तव हा सामना ईडन गार्डन्सवरून हलवण्यात आला. क्वालिफायर 2 आणि फायनल अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पुन्हा वेळापत्रकबद्ध करण्यात आले. क्वालिफायर 2 मध्ये 1 जून रोजी पावसाचा मोठा परिणाम झाला. नाणेफेकीनंतर खेळ दोन तासांपेक्षा अधिक उशिरा सुरू झाला. संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणारा हा सामना अखेर रात्री 9:45 वाजता सुरू झाला. त्यानंतर आता फायनलमध्येही पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
कसे असेल अहमदाबादचे हवामान
अहमदाबाद हवामान खात्याच्या अंदाजानुसार, इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचे संचालक अरुणकुमार दसाने म्हणाले की, दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि वेगवेगळ्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अॅक्यूवेदरच्या मते, सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी असली तरी पाऊस पडला तरी तो थोडासाच व्यत्यय आणू शकतो. सामन्यादरम्यान अहमदाबादमधील तापमान 27 अंश राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे चाहते आणि खेळाडूंना उष्णतेपासून दिलासा मिळेल. परंतु ढगाळ हवामानामुळे आर्द्रता असू शकते.
नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी
नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे, जिथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. पंरुत दवामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो, त्यामुळे टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेईल, अशी शक्यता आहे.
पावसामुळे अंतिम सामना रद्द झाला तर काय होईल?
अंतिम सामना पूर्ण व्हावा यासाठी पंच उत्सुक असतील. थोडासा पाऊस पडल्यास अडचण येणार नाही. कारण सामना संपविण्यासाठी 120 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल. परंतु, पाऊस मुसळधार असेल आणि खेळ होणे शक्य नसेल तर राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. राखीव दिवशीही खेळ शक्य नसेल, तर पॉइंट टेबलमध्ये वरच्या स्थानावर असलेल्या संघाला विजेतेपद दिले जाईल. लीग स्टेज संपल्यानंतर 14 सामन्यांपैकी नऊ विजयांसह पंजाब किंग्जने अव्वल स्थान पटकावले आहे. जर मंगळवारी आणि राखीव दिवशीही पावसामुळे खेळ होऊ शकला नाही तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ विजेता होईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant