Breaking News
शिवसेना पक्ष आयोजित “चला खेळूया मंगळागौर” कार्यक्रम उत्साहात !
ठाणे :– मिरा-भाईंदर शिवसेना शहर आयोजित “चला खेळूया मंगळागौर” हा पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम बुधवार, दिनांक २० ऑगस्ट रोजी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेल्या पाच वर्षांपासून श्रावण महिन्यात पारंपारिक शिवसेना महिला आघाडीमार्फत या मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन होत असून यंदाही तब्बल ३१ महिला गटांचा सहभाग नोंदवला गेला होता.
या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या सर्व महिला गृहिणींनी आपली परंपरा आणि संस्कृती जोपासत वेगवेगळे खेळ, गाणी आणि उपक्रम सादर केले. या मंगळागौर कार्यक्रमात अनेक जनजागृती करणारे सादरीकरण देखील पाहायला मिळाले. ज्यात विभाग क्रमांक १० मधील बाईपण भारी ग्रुप द्वारे किन्नर समाजातील सत्य स्थिती आणि जनजागृतीचे सदरीकरण तसेच प्रभाग क्रमांक 4 मधील शिवकन्या महिला ग्रुप द्वारे प्लास्टिकची जनजागृती आणि प्रभाग क्रमांक ११ मधील शक्ती मंगळागौर ग्रुप मार्फत पारंपारिक मंगळागौर आणि योगा याचे उत्तम मेळ घालणारे सादरीकरण पाहायला मिळाले.
या उपक्रमाचा उद्देश महिलांना एकत्र आणून समभावाची भावना वाढवणे, सामाजिक व सांस्कृतिक ऐक्य बळकट करणे तसेच महिलांचे मनोबल वाढवणे हा आहे. या कार्यक्रमात एकूण ११ लकी ड्रॉ विजेत्यांना दैनंदिन जीवनात स्वयंपाकघरात उपयुक्त ठरतील अशा आकर्षक इलेक्ट्रोनिक वस्तू भेट स्वरूप देण्यात आल्या.
कार्यक्रमाला उपस्थित राहून महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री
प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी महिलांचे विशेष कौतुक केले.
मंत्री सरनाईक म्हणाले की, “आपली परंपरा, संस्कृती आणि वारसा जपत त्याला आधुनिक युगाशी जोडणे हीच खरी काळाची गरज आहे. ‘चला खेळूया मंगळागौर’ सारख्या उपक्रमांमुळे महिलांना केवळ मनोरंजनाची संधी मिळत नाही तर सामाजिक ऐक्य, आत्मविश्वास आणि आरोग्यदृष्ट्याही त्याचा मोठा फायदा होतो. मी आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम अखंडपणे सुरु ठेवला. महिला हा समाजाचा कणखर कणा आहे आणि तो मजबूत राहावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सतत प्रयत्न केले जातात. स्त्री ही कमजोर नसून कणखर आहे हे दरवर्षी या मंगळागौर कार्यक्रमाच्या माध्यमातून सिद्ध होते.”
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला, नागरिक तसेच मान्यवर उपस्थित होते. सदर प्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यात मिरा भाईंदर शहर महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर, १४६ विधानसभा मतदारसंघ मिरा-भाईंदर शहर शिवसेना महिला संघटक पूजा आमगावकर, १४५ विधानसभा मतदारसंघ मिरा-भाईंदर शहर शिवसेना महिला संघटक रिया म्हात्रे, महिला जिल्हा सचिव मिरा-भाईंदर शहर आणि माजी नगरसेविका तारा घरत, माजी नगरसेविका संध्या पाटील, माजी नगरसेविका वंदना पाटील, माजी नगरसेविका भावना भोईर, माजी नगरसेविका सुनिता पाटील, माजी नगरसेविका शर्मिला बगाजी आणि माजी नगरसेविका हेलन जॉर्जी यांचा मोलाचा वाटा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar