Breaking News
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार !
मुंबई - दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (सन २०२५ ते २०३०) श्रमिक उत्कर्ष सभा प्रणित ‘सहकार समृध्दी पॅनेल’कडून आमदार प्रसाद लाड आणि आमदार प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. पॅनेलमध्ये समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, दि इलेक्ट्रिक युनियन, एस् सी एस् टी वेल्फेअर असोसिएशन, बहुजन एम्प्लॅाईज यूनियन या पाच संघटना एकत्र येऊन लढत आहेत.
आमदार लाड म्हणाले, “पतपेढीच्या निवडणुकीत सर्व समाजघटकांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन, संस्थेचे रक्षण व विकास हा आमचा एकमेव हेतू आहे. ही निवडणूक कोणत्याही पक्षाची नसून, सहकार क्षेत्रातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची असते. संस्था टिकली तरच सहकार टिकेल.”
त्याचप्रमाणे BEST कामगारांना हक्काची घरे मिळवून देणे आणि त्यांच्या मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हा माझा ठाम संकल्प आहे,” असे प्रतिपादन आमदार प्रसाद लाड यांनी केले.
त्यांनी विरोधकांच्या कारभारावर तीव्र प्रहार करताना सांगितले की, “मुंबई महापालिकेत जसा भ्रष्टाचार झाला, तसाच भ्रष्टाचार विरोधकांनी बेस्ट पतसंस्थेतही केला आहे. BEST विकायला काढण्याचा प्रयत्न झाला, आणि आज ती ३००० कोटींनी बुडीत आहे. आम्ही त्यासाठी पर्याय सुचवले आहेत. डेपो न विकता भाड्यावर देणे यासह इतर उपाययोजना आम्ही मांडल्या आहेत.”
पत्रकार परिषदेत आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले की, “कामगार देशोधडीला लागणार नाही, हीच आमची ठाम भूमिका आहे. मुंबै बँकेच्या मदतीने ही पतपेढी मोठी झाली, परंतु मागील काही वर्षांत येथे मनमानी कारभार व भ्रष्टाचाराच्या तक्रारी सतत आमच्या कानावर येत होत्या. आम्ही ७०० हून अधिक BEST नैमित्तिक कामगारांचा प्रश्न मार्गी लावला. BEST डेपोमध्ये कामगारांना रूम मिळावी यासाठी प्रयत्न केले. कोविड भत्ता मिळवून देण्याचे काम केले असून, त्यातील ५२ कोटी रुपयांचा निधी थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.”
पतपेढीत झालेल्या गैरकारभाराची पोलखोल त्यांनी करताना सांगितले की, “याबाबत चौकशी सुरू आहे, आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आमची लढाई सुरूच राहील.”
यावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रविण दरेकर म्हणाले, “पतसंस्थेला सर्वतोपरी आधार देण्याचे काम आम्ही करू. BEST कामगारांनी शिवसेनेला वाढवण्यात मोलाची भूमिका निभावली, परंतु उबाठा सेनेने कामगारांना पिळून काढण्याचे काम केले. आम्ही मात्र कामगारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून पतपेढीसाठी आवश्यक ती मदत पुरवू. सहकार क्षेत्रात काम करताना सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणे हेच आमचे ध्येय आहे.”
सहकार समृध्दी पॅनेलची निशाणी कपबशी असून, ती पाच पांडवांच्या एकतेचे प्रतीक असल्याचे लाड यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, “ही निवडणूक आम्ही सत्यासाठी लढत आहोत. तसेच BEST ला गतवैभव परत मिळवून देण्यासाठीच्या काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
सहकार समृध्दी पॅनेलच्या उमेदवारांनी या निवडणुकीत संस्था टिकवणे, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि भ्रष्टाचाराचा अंत हाच मुख्य अजेंडा असल्याचे यावेळी जाहीर केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant