Breaking News
शिक्षकांच्या आंदोलनाला यश; सरकारकडून 20% वाढीव पगाराचा शब्द, लवकरच रक्कम खात्यात जमा होणार
राज्यातील विनाअनुदानित खासगी शाळांतील शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात शिक्षकमंडळींना गाठून मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी घोषणा केली. राज्य सरकारने 20% वाढीव पगार लवकरच शिक्षकांच्या खात्यात जमा करण्याचं आश्वासन दिलं आहे. ही रक्कम पावसाळी अधिवेशन संपताच (18 जुलैनंतर) जमा केली जाईल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस आणि शिक्षकांमध्ये सकारात्मक चर्चा
शिक्षकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. गिरीश महाजन यांनी सांगितलं की, ही चर्चा सकारात्मक झाली असून मुख्यमंत्री शिक्षकांच्या अडचणी समजून घेत आहेत. यापुढे पगाराची तारीख लांबवली जाणार नाही, असं स्पष्ट आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिलं.
शिक्षकांची मुख्य मागणी काय होती?
राज्यातील जवळपास 5,000 खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने 20% अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 च्या अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर 10 महिन्यांनंतरही निधी वितरित करण्यात आलेला नाही. याच कारणामुळे 8 आणि 9 जुलै रोजी राज्यभरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि शिक्षकांनी आझाद मैदानात जोरदार आंदोलन छेडले होते.
शिक्षण संस्थांची आणि शिक्षकांची संख्या
राज्यात सध्या 5,844 अंशतः अनुदानित खासगी शाळा कार्यरत आहेत.
त्यात 820 प्राथमिक, 1,984 माध्यमिक आणि 3,040 उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे.
एकूण 3,513 प्राथमिक, 2,380 माध्यमिक आणि 3,043 उच्च माध्यमिक तुकड्या आहेत.
या शाळांमध्ये 8,602 प्राथमिक शिक्षक, 24,028 माध्यमिक शिक्षक आणि 16,932 उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत.
सरकारची भूमिका आणि आश्वासन
गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं की, "पुरवणी मागणी अद्याप सभागृहात मांडता आली नसली, तरी 18 जुलै रोजी अधिवेशन संपताच वाढीव पगार शिक्षकांच्या खात्यात जमा केला जाईल." ते पुढे म्हणाले, "थोड्या आर्थिक अडचणीमुळे आधी अडथळे आले, पण यापुढे पगाराच्या तारखेत कोणतीही गडबड होणार नाही. सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेतलं आहे."
नेत्यांकडून पाठिंबा
शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आझाद मैदानात जाऊन शिक्षकांची भेट घेतली. त्यामुळे आंदोलनाला राजकीय पातळीवरही बळकटी मिळाली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर