Breaking News
मुंबईतील सर्व कबूतरखाने एका महिन्यात होणार बंद
मुंबई - मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक असणारे शहरात ठिकठिकाणी असलेले कबुतरखाने आता लवकरच बंद होणार आहेत. कबूतरखान्यांबाबत विशेष मोहिम हाती घेण्याबाबत मुंबई महापालिकेला आदेश देण्यात येतील असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत 51 कबूतरखाने आहेत. या ठिकाणी कबूतरांमुळे श्वसनविकार, दुर्गंधी व प्रदूषण वाढत असून, यावर नियंत्रण आवश्यक आहे.
विधान परिषदेच्या सदस्या मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. यावेळी सदस्य चित्रा वाघ यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. मुंबईतील कबूतरखाने आणि त्यामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक त्रासाबाबत मंत्री सामंत यांनी विधानपरिषदेत माहिती दिली.
काही कबूतरखाने न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते असे सांगून मंत्री सामंत म्हणाले की, हे कबूतरखाने पुन्हा सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी कबूतरांना धान्य टाकणे थांबवावे यासाठी जनजागृती आवश्यक आहे. महापालिकेला एक महिन्यात कबूतरखाने बंद करण्यासाठी विशेष ड्राइव्ह राबवण्याचे आणि जनजागृती मोहिम सुरू करण्याचे निर्देश लवकरच दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar