Breaking News
एनटीसी गिरण्यांतील कामगार बेरोजगार होता कामा नये, यासाठी ना. नितिन गडकरी यांनी पुढाकार घ्यावा!
हरिभाऊ नाईक यांच्या स्मृतीदिनी सचिन अहिर यांची मागणी
नागपूर - देशातील भारत सरकारच्या 22 एनटीसी गिरण्या गेल्या चार वर्षापेक्षा अधिक काळापासून बंद आहेत.या प्रश्नावर आम्ही केंद्रीय स्तरावर मोठेच प्रयत्न केले आहेत.परंतु आता या गिरण्यातील कामगार बेरोजगार होता कामानये ,यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घ्यावा आणि त्या पूर्ववत चालाव्यात यासाठी प्रयत्न करावे,असा आग्रह राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी येथे ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या स्मृतीदिनी बोलताना केला आहे.
माजी राज्यमंत्री, मुंबई आणि नागपूर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, नागपूरचे माजी महापौर,ज्येष्ठ कामगारनेते हरिभाऊ नाईक यांचा तृतीय स्मृतिदिन नागपूर शहरातील कॉटन मार्केट येथे काल संपन्न झाला.हरिभाऊ नाईक स्मृती समाजसेवा संस्थेच्या विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मुख्यअतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला एस.क्यु.झामा, रत्नाकर शेडगे,मुंबई,राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते,खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण,संजय हरिभाऊ नाईक,जी.बी.गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोविड काळात करोनाचे कारण पुढे करून, मुंबई-महाराष्ट्रसह देशाभरातील चालू असलेल्या एनटीसीच्या 22 गिरण्या केंद्र सरकारने बंद केल्यामुळे कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सुमारे 20 हजारापेक्षा अधिक कुटुंबीयांची उपासमार सुरू आहे,असे सांगून सचिन अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, नेहमीच स्पष्ट बोलणारे आणि आपल्या कर्तृत्वातून आमदारां मध्ये आदर्श ठरलेले नितीन गडकरी केंद्रात आपल्या मध्यस्थिने हा प्रश्न सोडवतील, अशी आशाही आमदार सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
ज्येष्ठ कामगारनेते हरिभाऊ नाईक यांनी कामगारांच्या प्रश्नावर उभारलेल्या लढ्यातून केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर आपले कर्तृत्व उंचाविले आहे,आशा शब्दात सचिनभाऊ अहिर यांनी हरिभाऊ नाईक यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
सिध्दांतावर चालणारे नेते
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी आपल्या नेहमीच्या शैलीत म्हणाले,राजकारण पैसा खाणा-यांचा धंदा झाला आहे,या अशा काळात हरिभाऊ नाईक यांचे नेतृत्व घडत गेले,पण त्यांनी आपला सुसंस्कृतपणा कधीच सोडला नाही. हरिभाऊ नाईक सिध्दांतावर चालणारे नेते होते.इंटकचे ध्येयधोरणे त्यांनी कधी सोडली नाहीत.आपल्या नेतृत्व काळात त्यांनी भ्रष्टाचाराला कधीही थारा दिला नाही आणि कामगार कल्याणाची भूमिका कधीही सोडली नाही, म्हणूनच ते कामगारांच्या ऋदयात कायम राहिले आहेत,असेही नितीन गडकरी आपल्या भाषणात म्हणाले.
एस.क्यू.झामा, गोविंदराव मोहिते आदी कामगार नेत्यांची त्यावेळी हरिभाऊ नाईक यांच्या कामगार चळवळीतील योगदानावर भाषणे झाली. या प्रसंगी हरिभाऊ नाईक स्मृती समाजसेवा संस्थेच्या वतीने शहरातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक सहाय्य आणि हुशार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant