Breaking News
सिंधूताई सपकाळांच्या संस्थेचं नाव वापरून लग्नांसाठी अनेकांची फसवणूक
मुंबई - सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाचा गैरवापर करून अनेकांची विवाहासाठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ममता सिंधुताई सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे, आणि लोकांना अशा अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही वर्षांत लग्नाच्या आमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विवाह इच्छुक मुलांना सामाजिक संस्थांमध्ये वाढलेल्या मुलींशी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले जाते, आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावानेही अशीच फसवणूक सुरू असल्याचे समोर आले आहे.
ममता सपकाळ यांनी सांगितले की, “माई, पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने सोशल मीडियावर खोटे अकाउंट तयार करून, त्यावर लग्नासाठी मुली आहेत असे भासवले जात आहे. त्यासाठी अमुक एक रक्कमेचा उल्लेख करून मुलांसाठी मुलगी शोधणाऱ्यांची फसवणूक केली जात आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, “आजच्या घडीला माईंच्या कुठल्याही संस्थेत लग्नासाठी मुलीच नाहीत. कारण त्या आपले शिक्षण पूर्ण करत आहेत, आणि त्या त्यांच्या पायावर उभ्या झाल्याशिवाय संस्था त्यांना लग्नासाठी आग्रह करणार नाही.”
सिंधुताई सपकाळ संस्थेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, आणि फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकांनी अशा खोट्या जाहिरातींना बळी पडू नये, आणि संस्थेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरूनच माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर