Breaking News
यावर्षीचा खगोलशास्त्र जीवन गौरव पुरस्कार भरत अडूर यांना !
ठाणे – मराठी खगोल अभ्यासक मंडळ कार्यकारिणीची सभा शनिवारी ठाणे येथे संपन्न झाली. त्यामध्ये यावर्षी चौदावे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने 20-21 डिसेंबर रोजी ठाणे येथे घेण्याचे ठरले. या संमेलनात यावर्षींचा खगोलशास्त्र जीवन गौरव पुरस्कार नेहरू तारांगणातील निवृत्त शास्त्रज्ञ भरत अडूर यांना देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष दा.कृ.सोमण यांनी जाहीर केले.
डिसेंबरमध्ये होणा-या या खगोल अभ्यासकांच्या संमेलनात डाॅ. जयंत नारळीकर यांच्या विश्वनिर्मिती सिद्धांत संबंधित संशोधनावर एक व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. तसेच एस्ट्राॅइड, गगनयान, आधुनिक दुर्बिणी वगैरे विषयांवर तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच या संमेलनाच्या निमित्ताने रात्री आकाश दर्शन कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या या खगोल संमेलनात महाराष्ट्रातील खगोलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत. मागील राज्यस्तरीय खगोल संमेलन पिंपरी चिंचवडच्या तारांगणात आयोजित करण्यात आले होते.
शनिवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेस संस्थेचे अध्यक्ष दा.कृ.सोमण, छत्रपती संभाजी नगर येथील तारांगणाचे श्रीनिवास औंधकर, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह प्रा. नामदेव मांडगे, पिंपरी चिंचवड तारांगणाचे कासार, नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणीचे सुधीर फाकटकर, कल्याण आकाशमित्र संस्थेचे हेमंत मोने, नाशिकचे सचिन मालेगावकर आणि नेहरू तारांगणाचे निवृत्त शास्त्रज्ञ भरत अडूर उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर