Breaking News
‘शिवाजी पार्क मैदानात पुतळा उभारण्याचा निर्णय…’, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावना
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे क्रिकेटविश्वातील मोठं नाव..या क्रिकेटपटूची सर्व जडणघडण शिवाजी पार्कच्या मातीत घडली. आज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलं ते या मातीत घाम गाळून.. प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकरला शिवाजी पार्कात क्रिकेटचे धडे दिले. याच मैदानात रमाकांत आचरेकर सरांकडून सचिनने क्रिकेटचे बारकावे शिकले. याच अभ्यासाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवला. रमाकांत आचरेकर सर, शिवाजी पार्क आणि सचिन तेंडुलकर यांचं एक वेगळं नातं आहे. असं असताना याच शिवाजी पार्कात दिवंगत रमाकांत आचरेकर सरांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही आनंदी झाला आहे. त्याने आपल्या भावना ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
‘आचरेकर सरांचा माझ्या आणि इतरांच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे. मी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बोलत आहे. त्यांचे आयुष्य शिवाजी पार्कमधील क्रिकेटभोवती फिरले. शिवाजी पार्कवर कायम राहणे हीच त्यांची इच्छा असेल. आचरेकर सरांच्या कर्मभूमीवर पुतळा उभारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मी खूप आनंदी आहे.’, असं ट्वीट सचिन तेंडुलकर याने केलं आहे. रमाकांत आचरेकर यांनी फक्त तेंडुलकरच नाही तर प्रवीण अमरे, विनोद कांबळी आणि चंद्रकांत पंडित यांसारख्या दिग्गज खेळाडूंना घडवलं. हे सर्व खेळाडू भारतीय संघात खेळले आणि नावलौकिक मिळवला.
नगरविकास खात्याने जारी केलेल्या प्रस्तावानुसार, शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक 5 येथे रमाकांत आचरेकर सर यांचे 6x6x6 आकाराचे स्मारक उभारलं जाणार आहे. या पुतळ्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मुंबईच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने स्मारकाच्या बांधकामाची शिफारस केली होती. प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे 2 जानेवारी 2019 रोजी मुंबईत निधन झाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant