Breaking News
कुस्तीपटू विनेश फोगाटचे दिल्लीत जोरदार स्वागत
नवी दिल्ली - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वाढलेल्या वजनामुळे पदक मिळवण्याची संधी हुकलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आज ११ वाजता सकाळी पॅरिसहून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. यावेळी तिचे जंगी स्वागत करण्यात आले. ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकदेखील विनेश फोगाटच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर उभे होते. यावेळी विनेशने तिची सहकारी कुस्तीपटू साक्षी मलिकला मिठी मारली आणि रडू लागली. दिल्ली विमानतळावर स्वागत पाहून विनेश म्हणाली, “संपूर्ण देशाचे खूप खूप आभार, मी खूप भाग्यवान आहे.” बादली, झज्जरमध्ये विनेश म्हणाली – कालपर्यंत मी स्वतःलाच कोसत होते, पण आज मी म्हणू शकते की या जगात माझ्यापेक्षा भाग्यवान कोणी नाही.गोल्ड नाही मिळालं तर काय, पण आज देशाकडून जे प्रेम मिळतंय ते सोन्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
दिल्ली विमानतळ ते विनेशच्या मूळ गाव बलाली (चरखी दादरी जिल्हा) पर्यंत सुमारे १२५ किलोमीटरच्या मार्गावर अनेक ठिकाणी विनेशचे ‘भारत की शेरनी’ अशा घोषणा देत क्रीडाप्रेमींनी तिचे स्वागत केले. हे स्वागत आणि प्रेम पाहून विनेश भावूक झाली होती. तिला अश्रू आवरता आले नाहीत.
ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र, १०० ग्रॅम अधिक असल्याचे आढळल्यामुळे तिला अंतिम सामन्यासाठी अपात्र घोषित करण्यात आले. हे प्रकरण क्रीडा लवादाकडे गेले. तिने लवादाकडे रौप्य पदक देण्याची मागणी केली होती. परंतु, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तिचे अपील फेटाळले होते. मात्र, तरीही भारतात परतल्यावर आज तिचे यशोचित स्वागत झाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे